Wednesday, April 24, 2024
Homeनगरबिबट्याचा चौघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न

बिबट्याचा चौघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न

फत्याबाद (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील कडित बुद्रुक येथील शेतकरी तुळशीराम वडितके हे पत्नी व मुलासह ऊस तोडणी सुरु असलेल्या आपल्या शेतात काल पहाटे 5.30 वाजता मोटरसायकलवरुन जात असताना कोल्हार-बेलापूर रस्त्यावर कडित खुर्द व कडित बुद्रुक शिवरस्त्यावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठलाग सुरु केला. मात्र गाडी वेगात असल्याने वडितके कुटुंबिय बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले तर त्याच ठिकाणी संकेत मेनगर या 19 वर्षाचा तरुणावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला.

गेल्या महिन्यात गळनिंब येथील 3 वर्षाची मुलगी ज्ञानेश्वरी मारकड हिच्यावर बिबट्याने हल्ला करुन तिचा बळी घेतला. त्याचपूर्वी सप्टेंबरमध्ये कुरणपूर येथील दर्शन देठे या बालकाचा बिबट्याचा हल्ल्यात मूत्यू झाला. तशी काही घटना काल दि.21 रोजी महाशिवरात्रीच्या भल्या सकाळी होता होता टळली. कडित येथील शेतकरी तुळशीराम वडितके, पत्नी शुभांगी व मुलगा ऋषिकेश समवेत सकाळी 5.30 वाजता मोटरसायकलवरुन शेतात चालले होते. याचवेळी कडित शिवरस्त्यावर जानकु वडितके यांच्या उसाच्या शेतात नबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

मोटारसायकल वेगात असल्याने हे तिघेही बालंबाल बचावले. तर येथील संकेत मेनगर हा 19 वर्षाचा तरुण याच रस्त्यावरुन सायकलवरुन सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जात असताना बिबट्याने या तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सायकलच्या मागे काही तरी गुरगुरण्या सारखा आवाज आल्याने संकेत याने मागे पाहिले. त्याला बिट्या आपल्याकडे येत असल्याचे दिसले. त्याने बिबट्याच्या दिशेने सायकल ढकलून पळ काढला व आरडाओरडा केला. आवाज ऐकून तुळशीराम वडितके व प्रवरा सहकारी साखर कारखाना ऊसतोड मजुरांनी संकेतच्या दिशेने धाव घेतली. जमाव पाहुन बिबट्या पुन्हा उसाच्या शेतात पळुन गेला.

तरी वनविभागाने ड्रोन कॅमेर्‍याने नर भक्षक बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करावे, अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कडित खुर्द कडित बुद्रुक, मांडवे, फत्याबाद, कुरणपूर, गळनिंब, चांडेवाडी आदी गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.

बिबट्याच्या हल्ल्याच्या ठिकाणी वनअधिकारी पोहोचले असता ग्रामस्थांनी पिंजर्‍याची मागणी केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या रंगनाथ तमनर, सरपंच ज्ञानेश्वर वडितके, ज्ञानेश्वर मेनगर, संकेत मेनगर, अर्जुन वडितके, लहानू वडितके, भैय्या शिंदे, प्रविण होन यांना शेळी तुम्ही द्या पिंजरा आम्ही लावतो, असे वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी सांगितले. दरम्यान याबाबत वनक्षेत्रपाल श्री. जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता वनविभागाने सात शेळ्या घेतल्या असून कोणत्याही शेतकर्‍यांनी शेळ्या पिंजर्‍यात ठेवण्यासाठी देऊ नये असे आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या