डॉ. लहाडेच्या कृष्णकृत्यांना नवीन नाशिकमधून ‘आशीर्वाद’ ?

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) दि. ५ :- अवैध गर्भपात प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या डॉ.वर्षां लहाडेच्या कृष्णकृत्याचे एक एक पैलू उघडकीस येत आहे. या कृष्णकृत्याला नवीन नाशिकमधील काही कथित स्त्रीरोग तज्ज्ञांचा ‘आशीर्वाद’ असल्याची चर्चा जोर धरत आहे.

जिल्हा रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणी दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी भद्रकाली स्मशानभूमीतून दफन केलेले संबंधित अर्भक ताब्यात घेतले. त्यानंतर डॉ. लहाडेच्या पोलिस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ करण्यात आली.

मात्र डॉ. लहाडेला मदत करणारे अनेक हात शहरात अजूनही उजळ माथ्याने वावरत असून गर्भपाताचे मोठे रॅकेट असल्याच्या पोलिसांच्या संशयाला पुष्टी मिळत आहे.

या प्रकरणात लहाडे हिला मदत करणाऱ्या शहरातील इतर खासगी प्रसूतीगृहे, सोनोग्राफी केंद्रांचा सहभाग असल्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रात वर्तविली जात असून अशांची चौकशी होण्याची शक्यता असल्याने तिच्या मदतनीसांचेही धाबे दणाणले असल्याचे समजते.

दुसरीकडे नवीन नाशिक परिसरातील काही सोनोग्राफी केंद्रे व प्रसूतिगृह चालक डॉक्टरांचा या लहाडे प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या चर्चेला उधाण आले असून वर्षा लहाडेशी घनिष्ठ संबंध असलेल्या व सध्या एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या महिला डॉक्टरसह काही नावे वैद्यकीय क्षेत्रात चर्चिले जात आहे.

त्यामुळे नवीन नाशिकमध्ये या प्रकरणाची पाळेमुळे गुंतलेली असण्याची शक्यता आता वाढीला लागत आहे. यापूर्वीही नवीन नाशिकमधल्या काही प्रसुतीगृहे आणि सोनोग्राफी केंद्रांतील सोनोग्राफी मशीन आरोग्यविभागाने सील केल्याच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान वैद्यकीय व्यवसायाच्या आदर्श नीतिमूल्यांना स्वार्थासाठी पायदळी तुडविणाऱ्या वर्षा लहाडेशी संबंध असलेल्या त्या महिला डॉक्टरसह काही जणांना कोणत्या राजकीय पक्षाचा “आशीर्वाद” मिळाला आहे? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून वैद्यकीय क्षेत्राला कलंकित करणाऱ्यांच्या अब्रूचे धिंडवडे गजबजलेल्या “त्रिमूर्ती” चौकातूनच” काढण्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

*