कोपर्डी प्रकरणात पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांची साक्ष पूर्ण

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – कोपर्डी अत्याचार व हत्या प्रकरणातील तपासी अधिकारी तथा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांची मंगळवारी (दि. 23) साक्ष पूर्ण झाली. सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सरतपासणी तर आरोपी पक्षाच्या तिन्ही वकिलांनी उलटतपासणी घेऊन पाटोळे यांची महत्त्वाची साक्ष पूर्ण केली. या खटल्याचे कामकाज नियमितपणे चालणार आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासामोर या खटल्याचे काम सुरू आहे. कोपर्डी खटल्याचे दुसरे तपासी अधिकारी पाटोळे यांची मंगळवारी सकाळी साक्ष सुरू झाली. सरतपासणी घेताना हा तपास कसा केला असा प्रश्‍न अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केला. त्यावर पाटोळे यांनी सांगितले की, आरोपींकडून मोबाईल व सीमकार्ड जाप्त करण्यात आले होते. मोबाईल नंबरचे सिडीआर काढण्यासाठी पोलीस निरीक्षक गवारे यांना पत्र देण्यात आले होते.
घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर तेथील नकाशा काढण्यासाठी भूमी अभिलेख अधिकार्‍यांना पत्र देण्यात आले. त्यानंतर आरोपीचे वाहन जप्त करण्यात आले होते. ती कोठून घेतली, ती कोणाच्या नावे होती, तिचा मालकी हक्क कोणाचा आहे, हे कळण्यासाठी शोरूम मालकाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांच्या आदेशानुसार तीनही आरोपींच्या घरझडत्या करण्याचे पत्र गवारे यांना देण्यात आले होते.
दरम्यान आरोेपीच्या दुचाकीची कागदपत्रे हस्तगत केली होती, पीडित मुलगी कोणकोणत्या खेळात निष्णात होती, याची माहिती मिळण्यासाठी तिच्या वर्गशिक्षकांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांनी पीडित मुलीवर कोणकोणते उपचार केले याचे माहिती घेण्यात आली होती. मुंबई येथील कलिना येथून डीएनए रिपोर्ट प्राप्त केले होते असे पाटोळे यांनी सांगितले.
तपासी अधिकारी पाटोळे यांची उलटतपासणी घेताना मुख्य आरोपी पक्षाचे वकील योहान मकासरे यांनी विचारले, की आरोपी अटकेचा पंचनामा केला तेव्हा त्याच्या प्रती कोर्टाला सादर करण्यात आल्या. मात्र, आरोपीच्या वकिलांना देण्यात आल्या नाहीत. अटक पंचनाम्यावर आईचे नाव आहे. मात्र, त्यांची सही किंवा अंगठा घेतलेला नाही. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केल्याची कागदपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत.
पोलीस निरीक्षक गवारे यांच्याकडून तपास काढून घेतल्यावर त्याची नोंद स्टेशन डायरीला करण्यात आली नाही. आरोपीने दुचाकी घेतली आहे असे तपासात निष्पन्न होते, मात्र त्याने 45 हजार रुपये दुकानदारास दिल्याचा कोणताही पुरावा तुमच्याकडे का नाही? घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर त्याच्या प्रती न्यायालयात दाखल केल्या. मात्र, त्या आरोपी पक्षाच्या वकिलांना देण्यात आल्या नाहीत. घटनेनंतर आरोपींच्या दातांच्या कवळ्या जप्त करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या तपासावर आक्षेप असल्याचे मकासरे यांना न्यायालयात कथन केले.
अरोपी नितीन भैलुमे याचे वकील अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी उपलतपासणी घेताना पाटोळे यांना काही प्रश्‍न विचारले. आरोपी भैलुमे याच्या विरोधात काही सक्षम पुरावा आहे काय, त्यास अटक कोणत्या अनुषंगाने केली? राज्यात मोर्चे व अन्य आंदोलने तसेच राजकीय दबाव आल्यामुळे भैलुमे यास अटक करण्यात आल्याचा आरोप आहेर यांनी केला. भैलुमे हा कोपर्डीत रहतो असे कोणतेही पुरावे नाहीत. त्याच्या वडिलांच्या घराचा उतारा सादर करण्यात आला.

मात्र त्यावरून तो कोपर्डीत राहतो असे निष्पन्न होत नाही. त्याचे अन्य आरोपींशी संभाषण नाही, संबंध नाही तरी देखील त्यास खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोप आहेर यांनी केला. तर अ‍ॅड. खोपडे यांनी युक्तिवाद केला, की संतोष भवाळ हा खांडवी येथील भवानीनगर येथे राहणारा आहे. पोलिसांनी हा तपास खोटा केलेला आहे. तपासात अनेक दोष आहेत, स्टेशन डायरीला नोंदी नाहीत त्यामुळे भवाळ यास या प्रकरणात गुंतविण्यात आले आहे. युक्तिवादानंतर न्यायालयाचे कामकाज थांबविण्यात आले. आज पोलीस कर्मचार्‍याची साक्ष होणार आहे.

30 साक्षी पूर्ण
कोपर्डी प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असून आजपर्यंत 30 साक्षीदारांच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. अणखी दोन तारखांच्या नंतर या सुनावणीला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर या खटल्यात नेमके काय होते यावर सर्वांची नजर असणार आहे.

LEAVE A REPLY

*