कर्जतमध्ये 124 शाळा खोल्या धोकादायक

0
कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या खोल्या धोकादायक असून शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागले आहे. धोकादायक वर्ग खोल्यांच्या यादीत कर्जत शहरातील जिल्हा परिषद शाळा देखील येत आहे.
निबोंडी येथील घटनेनंतर तालुक्यातील शाळांचा आढावा घेतला असता तालुक्यातील 124 खोल्या धोकादायक असल्याचे उघड झाले आहे. शाळा निर्लेखन करण्यासाठी तीन वर्ष पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने धक्कादायक प्रकार सुरू आहे.
कर्जत शहरातील मुले व मुलींची शाळेतील 19 वर्ग खोल्या आहेत. शाळेचे बांधकाम 1964 साली झाले आहे. त्यामुळे अनेक वर्गखोल्यांची दुरवस्था झाली असून तेथील मुले शिक्षण घेत आहे. शाळेचे मुख्याद्यापक श्री. खडागळे यांनी सांगितले की, 25 फेबुवारी 2014 साली शाळा इमारत अवस्थेचा प्रस्ताव पाठवला आहे. 3 वर्ष उलटूनही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने निर्लेखनही केले नाही.
टाकळी खंडेश्‍वरी येथील शाळेची इंजिनियरने पाहणी केली असता 5 खोल्या निर्लेखन म्हणजे धोकादायक असल्याचा अहवाल दिला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा मोनीका राजळे यांनी 2 खोल्या नवीन दिल्या. मात्र 3 खोल्यांचा प्रश्‍न तसाच आहे.
अशा धोकादायक खोल्यामध्ये विद्यार्थी बसतात, अशी माहिती माजी उपसभापती किरण पाटील यांनी दिली. घुमरीची शाळेच्या धोकादायक इमारतीत विद्यार्थी व शिक्षक जीव मुठीत घेऊन शाळा भरवत आहेत, अशी माहिती प्रविण अनभुले यांनी दिली.
चिंचोली शाळेचीही हिच अवस्था असल्याचे पिंटू पवार यांनी सांगितले. धांडे वस्ती येथिल शाळा धोकादायक असल्याचे तुशार धांडे यांनी कळवले आहे. शिंदावाडी येथील शाळेच्या इमारतीच्या भिंतींला भेगा पडल्या आहे. खंडाळा येथिल शाळेची इमारत पावसाळ्यात गळत आहे.

निबोंडीतील घटनेनंतर कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उत्तम दराडे, उपसभापती प्रशांत बुध्दीवंत, गटशिक्षण अधिकारी उज्वला गायकवाड व सर्व विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची बैठक घेऊन प्रत्येक शाळेमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन समिती स्थापन्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शाळांना धोकादायक खोल्यांमध्ये विद्यार्थी बसवू नये व जादा पाऊस असल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी सोडवावे, अशा सूचना दिल्या. 

LEAVE A REPLY

*