‘जिंदाल सॉ’ला उत्पादन बंद करण्याचे आदेश

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

0
सिन्नर | विलास पाटील- वारंवार सूचना देऊनही कारखान्याकडून होत असलेले प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलली जात नसल्याचे कारण देत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने माळेगाव वसाहतीतील जिंदाल सॉ लिमिटेड कारखान्यास पुढील निर्देश येईपर्यंत उत्पादन बंद करण्याचा आदेश दिला आहे.
या कारखान्याचा वीज व पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचेही आदेश वीज वितरण कंपनीसह महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीला दिले आहेत. सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या ७५ एकर क्षेत्रावर दोन हजार कोटींची उलाढाल असलेल्या व सुमारे तीन हजार कामगार-कर्मचार्‍यांना रोजगार देणार्‍या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कायद्याचा बडगा उगारल्याने उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील या कारखान्यात सिमलेस पाईप बनवले जातात. दगडी कोळसा जाळून निघणारा गॅस हे पाईप बनवण्यासाठी इंधन म्हणून वापरला जातो. त्यासाठी कारखान्याच्या मागच्या बाजूला गॅसीफायर बनवण्यात आल्या असून त्याच कारखाना सुरु झाल्यापासून वादाचा मुद्दा बनल्या आहेत.

दगडी कोळसा जाळल्यानंतर उडणारी धूळ परिसरातील शेतीत पसरुन शेती उध्वस्त करीत असल्याचा मापरवाडीच्या शेतकर्‍यांचा आरोप असून त्याविरोधात शेतकर्‍यांनी अनेकदा आंदोलनही केले होते. या शेतकर्‍यांनी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे कैफीयत मांडल्यानंतर राजाभाऊंनी पुढाकार घेऊन शेतकरी-व्यवस्थापनाची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत संयुक्त बैठकही बोलावली होती.

त्यावेळी शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारी दूर करण्यासाठी व्यवस्थापनाने काही बदल करण्याबाबत सुचनाही करण्यात आल्या होत्या. त्या सुचनांप्रमाणे हवे ते सर्व बदल केले असल्याचा व्यवस्थापनाचा दावा आहे. तर कारखान्याच्या प्रदूषणामुळे शेती उध्वस्त होत असल्याचा आरोप करीत शेतकर्‍यांनी महिनाभरापूर्वी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलनही केले होते.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने शेतकर्‍यांच्या तक्रारीनंतर १७ जून २०१६, १५ ऑक्टोबर २०१६, ७ एप्रिल २०१७ रोजी कारखान्याला भेटी देऊन केलेल्या पाहणीचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचीवांना पाठवला होता. त्यांच्याच निर्देशानुसार वारंवार सुचना देऊनही, आवश्यक ते बदल करण्यात कारखाना व्यवस्थापनाने कुचराई केल्याचा ठपका ठेवत कारखान्याचे उत्पादन बंद करण्याचा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी आर. यु. पाटील यांनी २२ मे रोजी बजावला आहे.

पाटील यांच्या आदेशानुसार कारखान्याचा वीज पुरवठा बंद करण्यासाठी विज वितरणने आज (दि.२४ ) कारखान्याच्या व्यवस्थापनाला पत्र दिले तर उद्या (दि.२५) दुपारी १२ वाजता पाणीपुरवठा बंद करण्यासाठी येत असल्याचे पत्र महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीच्या उपअभियंत्यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. जिंदाल सॉ लिमीटेड हा माळेगावसह सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठा कारखाना असून सुमारे विस-बावीस वर्षांपासून सुरु झालेल्या या कारखान्याने सुमारे अडीच हजार कोटींची गुंतवणूक त्यात केली आहे.

देशभरच नव्हे तर संपूर्ण जगभर सर्वात्कृष्ट सिमलेस पाईप बनवण्याचा बहुमान या कारखान्याने मिळवला असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार केलेल्या सुचनांचे पालन करीत व्यवस्थापनाने आवश्यक ते सर्व बदल केले असून कारखान्याकडून कुठलेही प्रदूषण होणार नाही याची सर्व ती काळजी घेतली जात आहे.

अडीच हजार कोटी गुंतवणार्‍या कारखान्याला प्रदूषण नियंत्रणासाठी २०-२५ लाखाचा खर्च करणे ही किरकोळ बाब असून आवश्यक ते सर्व बदल केल्यानंतरही कारखान्यावर आकसाने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप व्यवस्थापनाने केला आहे. कुठलीही कारवाई करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. मात्र, अशी कुठलीही नोटीस न बजावता थेट उत्पादन बंद करण्याचा आदेश बजावणे अन्यायकारक असून त्याविरोधात दाद मागण्याचे संकेतही व्यवस्थापनाने दिले.

आज तहसिलमध्ये बैठक
कारखान्यामुळे होणार्‍या प्रदुषणाचा फटका परिसरातील शेतीला बसून ही शेती उध्वस्त झाली आहे. शेतकर्‍यांना आपल्या द्राक्षबागा उखडून फेकाव्या लागल्या आहेत. शेतकर्‍यांच्या तक्रारीनंतर आपण स्वत: पुढाकार घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. व्यवस्थापन-शेतकर्‍यांमध्ये समन्वयाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, थेट कारखानाच बंद करा अशी मागणी आपण कधीही केली नव्हती. तालुक्यातील तीन हजार हातांना काम देणारा कारखाना चालावा तसेच शेतकर्‍यांची रोजीरोटीही त्यांच्यापासून कुणी हिरावून घेऊ नये यासाठी आपण प्रयत्न केले. शेतकरी व व्यवस्थापनात मार्ग काढण्यासाठी उद्या (दि.२५) सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालयात संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे. त्यात प्रदूषण मंडळाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीतून योग्य तो तोडगा काढण्यात येईल. आमदार राजाभाऊ वाजे

कारवाई अन्यायकारक
परिसरातील शेतकरी आमचे शत्रू नाहीत. मात्र, आम्ही त्यांचे शत्रू आहोत अशा पध्दतीनेच आजपर्यंत हे सर्व शेतकरी वागत आले आहेत. जे प्रदूषण आमच्यामुळे होत नाही, त्याचीही जबाबदारी आमच्यावर ढकलत आहेत. कोळशाची धुळ बाहेर उडू नये यासाठी सर्व ती उपाययोजना करण्यात आली आहे. आवश्यक तेवढे स्प्रिंकर्ल्सही बसवण्यात आले आहेत. प्रदूषण मंडळाने केलेल्या सुचनांप्रमाणे प्रदूषण कमी करण्याच्या सर्व उपाययोजना आम्ही केल्या आहेत. त्यात अजुन कमतरता आहे असे मंडळाला वाटत होते, तर तसे त्यांनी सांगितले असते तर ते बदलही आम्ही केले असते. मात्र, तसे करण्याची संधी न देता केलेली एकतर्फी कारवाई अन्यायकारक आहे.
दिनेशचंद्र सिन्हा, प्लॅन्ट हेड

LEAVE A REPLY

*