आयएए ‘यंग प्रोफेशनल्स’च्या प्रमुखपदी जनक सारडा

0
मुंबई | दि.१२ प्रतिनिधी- दि इंटरनॅशनल ऍडव्हर्टायझिंग असोसिएशन (आयएए) संचलित ‘यंग प्रोफेशनल्स’ विभागाच्या प्रमुखपदी ‘देशदूत मीडिया ग्रुप’चे संचालक जनक सारडा यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सारडा यांच्याकडे थेट आशिया-प्रशांत क्षेत्राचे नेतृत्व राहील. आयएएच्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर सारडा यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

सारडा यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना आयएएचे वरिष्ठ उपाध्यक्ष (वैश्‍विक) श्रीनिवासन के. स्वामी व बीबीडीओचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक आ. के. स्वामी म्हणाले, ‘अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही जबाबदारी सारडा यांच्याकडे सोपवताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. सारडा यांच्या आधीच्या संघटनात्मक अनुभवाचा आशिया-प्रशांत क्षेत्रातील युवा प्रोफेशनल्सना लाभ होऊ शकतो आणि आम्हास खात्री आहे की सारडा हे प्रभावी मार्गाने हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतील.

संस्थेच्या भारतीय चॅप्टरचे अध्यक्ष नीरज रॉय यांनीही सारडा यांच्या निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय चॅप्टरची धुरा वाहिलेल्या आणि त्यास समृद्ध केलेल्या व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपवल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
निवडीनंतर ऋण व्यक्त करताना सारडा म्हणाले, ‘आयएएच्या माध्यमातून युवा प्रोफेशनल्ससाठी आम्ही जाहिरात, विपणन आणि माध्यम या क्षेेत्रात विविध उपक्रम राबवले आहेत.

ही कार्यकक्षा आशिया-प्रशांत क्षेत्रात विस्तारित करण्याची संधी नव्या जबाबदारीमुळे मला प्राप्त झाली आहे. आशिया-प्रशांत क्षेत्राच्या प्रत्येक चॅप्टरमधील चांगल्या उपक्रमांची व्यवहार्यता पाहून ते इतरत्र राबवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतील. चांगल्या कल्पनांची ही देवाण-घेवाण परस्परांसाठी लाभदायी ठरेल. आयएए यंग प्रोफेशनल्सची अजोड बाब म्हणजे अगदी उद्योग विश्‍वात पाय ठेवणार्‍या उदयोन्मुखांसाठी ते संवादाचे व्यासपीठ ठरते. बोर्ड रूम संवाद, बेबीनर्स व सीईओ यांचे अमेरिका व इस्त्रायलचे दौरे एकूणच अनुभव समृद्धीला पोषक ठरतील.
सारडा म्हणाले, ‘जाहिरात, विपणन आणि संवाद क्षेत्रात युवा प्रोफेशनल्सच्या प्रगत व्यावसायिकतेला चालना मिळावी यास्तव मी आयएएचे क्षेत्रीय संचालक कौशिक रॉय आणि आशिया-प्रशांत क्षेत्राच्या इतर चॅप्टर्ससोबत जवळून कार्यरत राहण्याचा प्रयत्न करीन.’

सदस्यत्वाचे निकष असे..
आयएए संचलित ‘यंग प्रोफेशनल्स’चे सदस्यत्व ३५ वर्षांखालील उत्तम लौकिक असलेल्या तसेच जाहिरात, ब्रॅण्ड व्यवस्थापन, विपणन, मास कम्युनिकेशन अथवा माध्यम क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्तींना प्रदान करण्यात येते. वैश्‍विक स्तरावर असोसिएशनचे १५ देश मिळून एक हजार सदस्य आहेत.

LEAVE A REPLY

*