Thursday, April 25, 2024
Homeजळगावजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग

जळगाव – 

जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी भाजपच्या सदस्यामध्ये रस्सीखेच सुरु झालेली आहे. महिला सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर महिला  सदस्यांची नावे आता चर्चेत येत आहेत.

- Advertisement -

भाजपामधील काही सदस्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत फिल्डींग लावली जात आहे. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुचविलेल्या उमेदवारांना जिल्हापरिषदेत सत्तेचे सोपान सर करता येणार आहे. तर दुसरीकडे राज्यात सत्ता परिवर्तनचा पॅटर्न जिल्हापरिषदेतही यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या गटनेत्यांची मोर्चे बांधणी सुरु आहे.  त्यामुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मिनीमंत्रालय संबोधल्या जाणार्‍या  जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी भाजपच्या सदस्यांमध्ये दावेदारी सुरू झालेली आहे. त्यादृष्टीने एक गट भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि दसरा गट माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे फिल्डींग लावत असल्याच्या हालचाली गतीमान झालेल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्हापरिषदेतील भाजपच्या गटनेत्याकडून नाराज सदस्यांची मनधरणी करुन अतिरिक्त कामे देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, यापूर्वीही सत्ताधारी पक्षातील सदस्यांना निधी वाटपात डावलण्यात आले असून या नाराजीचा उद्रेक या निवडीत उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

त्यामुळे भाजप सदस्यांना एकसंघ राहण्याचे मोठे आव्हान भाजपच्या सदस्यांसह गटनेत्यांना पेलावे लागणार आहे. दरम्यान, भाजपमध्ये दोन गट पडले असून एक गट खडसे तर दुसरा गट महाजन यांना मानणारा आहे.

त्यामुळे कोणत्या गटाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होणार याविषयी चर्चांना उधान आले आहे. भाजपच्या एका गटाकडून गुप्त बैठक घेऊन वेगळी मोट बांधण्याच्या हालचाली होत असल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेवर भाजप पुन्हा आपले वर्चस्व ठेवण्यात यशस्वी होणार की महाविकास आघाडीच्या माध्यमातून परिवर्तन घडणार याविषयी 21 डिसेंबर रोजी चित्र स्पष्ट होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या