जेठ-भावजयीचा एकाच दोराने गळफास

0
चहार्डी, ता.चोपडा । दि.27 । वार्ताहर-एका विवाहीत तरुणाने आपल्या सख्ख्या लहान भावाच्या पत्नीसोबत असलेल्या विवाहपूर्वीच्या प्रेमसंबंधातून मंगळवारी सकाळी तिच्यासोबत एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बोरअजंटी येथे घडली.
मृत तरुणाच्या खिशात चिठ्ठ्या सापडल्या असून प्रेमसंबंधातून दोघांनी आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. दोघांचे जेठ व भावजयी असे नाते होते.

बोरअजंटी (ता.चोपडा) येथे दि.27 रोजी सकाळी 7 वाजेपुर्वी वैजापूर जाणार्‍या रस्त्यावर शिवदास भिका कोळी (वय 28) व सौ.भारती रोहिदास कोळी (वय 19) या दोघांनी निंबाच्या झाडाला एकाच दोरखंडाला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृत शिवदास कोळी हा भारतीचा सख्खा जेठ आहे. घटनेची खबर मिळताच डीवायएसपी सदाशिव वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक के. एस.पावरा, फौजदार रमाकांत ठाकूर, पो. कॉ. प्रदीप राजपूत घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून दोघांचे शव उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

मृत शिवदासच्या खिशात यापूर्वी दोघांनी एकमेकांना लिहलेल्या प्रेम प्रकरणाच्या चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यातील मजकुरावरून दोघे एकमेकांशी आपसात प्रेम करत होते.

एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत परंतु घरात व बाहेर त्यांना भेटता न आल्याने मध्यप्रदेशात पळून जाण्याचा विचार त्यांनी त्यात व्यक्त केला.

यासाठी लागणारा पैसा कसा प्राप्त करायचा? याबाबत त्यांनी योजनाही आखल्या होत्या. मात्र शेवटच्या एका चिठ्ठीत प्रेमपत्र नाव न घेता प्रतिज्ञापत्र असे त्यांनी नाव देत आता आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. म्हणून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहले आहे.

तसेच ही आत्महत्या आम्ही स्वखुशीने करीत असून, कुणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद करून खाली दोघांनी सह्या देखील केल्या आहेत.

दुपारी झाले शव विच्छेदन
घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून, उपजिल्हा रुग्णालयात दोघांचे शव पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद पाटील यांनी दोघांचे शवविच्छेदन केले.

लागलीच मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दोघांवर बोरअजंटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत शिवदास याचे आधीचे लग्न मोडल्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्याने बुधगाव (ता.चोपडा) येथील मुलीशी लग्न केले.

त्यानंतर त्याला एक मुलगी देखील आहे. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपूर्वी एका सामुहिक विवाह सोहळ्यात भारतीचे शिवदासचा सख्खा लहानभाऊ रोहिदास याचेशी लग्न झाले होते.

लग्नानंतर एकाच घरात दोन्ही भाऊ एकत्र राहत असल्याने शिवदास कोळी व भारती कोळी यांचे प्रेमप्रकरण जुळून आले आणि शेवटी प्रेम प्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याची दिवसभर चर्चा सुरू होती.

या संदर्भात प्रवीण साहेबराव सुलताने (रा.बोरअजंटी) यांच्या खबरीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास फौजदार रमाकांत ठाकूर करीत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*