Blog : गुणकपातीचा दुर्दैवी निर्णय

0

कला व क्रीडा प्रकारांमधील नैपुण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणांची खिरापत वाटली जात असेल तर तो प्रचलित शिक्षण व्यवस्थेचा दोष आहे.

व्यवस्थेचे हे अपयश झाकण्यासाठी या अतिरिक्त गुणांमध्ये कपात करून विद्यार्थ्यांचा बळी दिला जात आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या जागांमधील दोन टक्क्यांचा कोटाही रद्द करण्यात आला आहे.

हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात अडथळा आणणेच आहे.शिक्षण क्षेत्रासंदर्भात वादग्रस्त ठरणारे निर्णय, अशा निर्णयांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी संभ्रमावस्था त्याचबरोबर शैक्षणिक भवितव्याविषयीसतावणारी चिंता या जणू नित्याच्या बाबी झाल्या आहेत.

त्यामुळे एकूणच शिक्षण क्षेत्राच्या कार्यक्षमतेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. खरे तर शिक्षण क्षेत्राबाबतचे कोणतेही निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतले जाण्याची आवश्यकता आहे.

मुख्यत्वे त्या-त्या स्थितीत असे निर्णय घेणे खरेच गरजेचे आहे का, त्या निर्णयातून विद्यार्थ्यांचे नेमके कोणते हित साधले जाणार, त्या निर्णयांच्या अंमलबजावणीत कोणत्या अडचणी येऊ शकतात या प्रश्नांचा विचार आवर्जून केला जायला हवा.

तसे झाले तरच विद्यार्थ्यांना मोकळेपणाने उत्तम शैक्षणिक कारकीर्दीसाठी प्रयत्न करता येतील आणि शैक्षणिक वाटचालीचा आनंदही घेता येईल.

परंतु या अतिशय महत्त्वाच्या मुद्याकडे शासकीय पातळीवरून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उलटसुलट निर्णय, त्यात वेळोवेळी केले जाणारे बदल आणि अंमलबजावणीच्या पातळीवरील अडचणी या गर्तेत शिक्षण व्यवस्था अडकल्याचे पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दिल्या जाणार्‍या गुणांच्या कमाल मर्यादेत दहा गुणांची कपात करण्याच्या निर्णयाचा विचार करायला हवा.

खरे तर ही संकल्पना अनेक वषार्ंंपासून राबवली जात आहे. त्यानुसार शास्त्रीय नृत्य, गायन, वादन, लोककला, इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धा यात नैपुण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अतिरिक्त गुण दिले जातात.

विद्यार्थ्याच्या उपजत कला गुणांना वाव देणे, त्या-त्या कला प्रकारातील पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर या अतिरिक्त गुणांद्वारे या कलांची ओळख व्हावी, त्याविषयी गोडी वाटावी, असाही हेतू आहे.

लेखक – सुनील कदम, शिक्षणतज्ज्ञ

तो बर्‍याच प्रमाणात सफल होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. परंतु या गुणांचा आधार घेऊन अनेक विद्यार्थ्यांची एकूण गुणांची टक्केवारी वाढत चालल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांची एकूण गुणांची टक्केवारी वाढावी यासाठी हेतूपूर्वक अधिक गुण दिले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. अर्थात गेल्या काही वर्षांमध्ये दहावीच्या परीक्षेतील उत्तीर्णांचे प्रमाण बरेच वाढले आहे.

त्याचबरोबर 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्‍यांच्या संख्येतही बरीच वाढ झाली, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यामागे केवळ या अतिरिक्त गुणांचा आधार हाच भाग महत्त्वाचा आहे का?

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णांची संख्या कमी असायची. त्यावेळी शिक्षणाची गुणवत्ता घसरत चालल्याची ओरड होत होती.

त्याचबरोबर या परिस्थितीमागील कारणे लक्षात घेऊन शैक्षणिक धोरणात काही महत्त्वपूर्ण बदल करावेेत आणि निकालाची टक्केवारी वाढावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत होती.

परंतु या अपेक्षापूर्तीच्या दृष्टीने कला प्रकारासाठी दिल्या जाणार्‍या अतिरिक्त गुणांकडे पाहणेच मुळात चुकीचे आहे. मात्र याची जाणीव धोरणकर्त्यांना नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल.

अशा स्थितीत सरकारने कला आणि क्रीडा क्षेत्रासाठी प्रोत्साहनपर दिल्या जाणार्‍या गुणांची मर्यादा 25 वरून 15 वर आणण्याचा निर्णय घेतला.

त्याचबरोबर कला, क्रीडा या क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणार्‍यांसाठी अकरावीच्या जागांमध्ये असणारा दोन टक्क्यांचा कोटाही रद्द केला आहे.

त्याऐवजी आता विविध कला प्रकारांसाठी अतिरिक्त गुण देण्यासाठी नवी पद्धत तयार करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात ही पद्धत कोणती? त्यात अतिरिक्त गुणांसंदर्भात कोणते निकष आहेत? याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही.

त्यामुळे या नव्या बदलातून काय साधले जाणार? शासनाच्या या धोरणबदलाच्या अट्टाहासामुळे अतिरिक्त गुण देण्यामागील मूळ हेतूलाच धक्का पोहोचला आहे. आता नव्या पद्धतीत हा हेतू सफल होणार का? खरे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिक्षणाचा मूळ उद्देश आहे.

तो समोर ठेवूनच या क्षेत्राची वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा भाग महत्त्वाचा ठरतो व त्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे. तसे झाल्यास विद्यार्थी एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून विविध क्षेत्रात आपल्या उत्तम कार्याचा ठसा उमटवू शकतात.

क्रीडा प्रकारांमधील कौशल्याबाबत विचार करायचा तर विविध खेळांचे शालेय पातळीवरील महत्त्व अनन्यसाधारण आहे. विशेषत: शारीरिक वाढ होत असताना विद्यार्थ्यांच्या सुदृढतेच्या दृष्टीने विविध खेळ महत्त्वाचे ठरतात.

खेळांद्वारे उत्तम व्यायाम होतो आणि शरीराची कार्यक्षमता, रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते. परिणामी दीर्घकाळ आरोग्यदायी जीवनाचा आनंद घेता येतो.

हे झाले वैयक्तिक पातळीवरील अनुभवांचे महत्त्व. सामाजिकदृष्ट्या विचार करायचा तर खेळांमुळे उत्तम नेतृत्वगुण विकसित होतात, संघटन कौशल्य अंगी बाणवता येते. शिवाय अंगी निर्णयक्षमता येते. सहकार्‍यांशी जुळवून घेणे, इतरांच्या मताचा आदर राखणे याचे भान राखले जाते.

हे गुण सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात.आजवर अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये दिमाखदार कामगिरी करत देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे.

यातील बहुतांश खेळाडूंमधील क्रीडानैपुण्य ओळखून शालेय जीवनापासून वाव देण्यात आला, हे लक्षात घ्यायला हवे. संगीत तसेच इतर कलागुणांचा विकासही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरतो.

आपल्याकडे विविध कला प्रकारांना संपन्न वारसा राहिला आहे. तो पुढे नेणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीनेही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

असे असले तरी या कलागुणांचा विकास प्राथमिक अवस्थेत गरजेचा ठरतो. परंतु हीच प्रक्रिया आता क्रीडा, कला या प्रकारात नैपुण्य मिळणार्‍या विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त गुणांमध्ये कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अडचणीत सापडणार आहे.यातून आपण भविष्यातील उत्तम खेळाडू तसेच कलाकारांना मुकणार आहोत.

खरे तर कला, क्रीडा या प्रकारासाठी विद्यार्थ्यांना गुणांची खिरापत वाटली जात असेल तर तो दोष विद्यार्थ्यांचा नाही. तो प्रचलित शिक्षण व्यवस्थेचा दोष आहे, परंतु अशा निर्णयामुळे शिक्षण व्यवस्थेचे हे अपयश कुठे तरी झाकण्यासाठी विद्यार्थ्यांचा बळी दिला जात आहे.

कला, क्रीडा या क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणार्‍यांसाठी अकरावीच्या जागांमध्ये असणारा दोन टक्क्यांचा कोटाही रद्द करण्यात आला आहे. वास्तविक अशा विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या जागांमध्ये किमान दहा टक्के जागा राखीव असायला हव्यात. परंतु तसे न करता केवळ दोन टक्के जागा ठेवण्यात आल्या आणि आता त्याही जागा रद्द करण्यात आल्या आहेत.

हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खोडा घालणेच आहे. इथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे युरोप,
अमेरिका आदी देशांमध्ये विद्यार्थीदशेत कलागुणांना जेवढा वाव दिला जातो त्याच्या एक टक्काही वाव आपल्याकडे दिला जात नाही.

पाश्चात्य देशात प्राथमिक अवस्थेत असताना विद्यार्थ्यांमधील कलागुण हेरून विकसित करण्यावर भर दिला जातो. तसा तो आपल्याकडेही दिला जायला हवा.

खरे तर खेड्यापाड्यात शिक्षणाव्यतिरिक्त मोठे टॅलेंट आढळते. ते शोधून काढण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये गेले पाहिजे. उदाहरण द्यायचे तर आदिवासी भागातून आलेल्या लिंबाराम या खेळाडूने आशियाई स्पर्धेत तिरंदाजीत भारताला पारितोषिक मिळवून दिले.

असे खेड्यापाड्यातील, दुर्गम भागातील गुणी खेळाडू शोधण्यात व्यवस्था कमी पडतेय. किंबहुना, असे खेळाडू तयार करण्याऐवजी केवळ कारकून निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.

गेल्या तीन वर्षांत विविध वादग्रस्त निर्णयांमुळे आणि घटना-घडामोडींमुळे शिक्षण व्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे विद्यार्थी चळवळीतून पुढे आले आहेत.

तरीही त्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न माहीत नसतील तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. देशाला विविध क्षेत्रात उत्तम नेतृत्वगुण निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

तरच हा तरुणांचा देश आहे असे म्हणत पुढच्या पिढीबाबत आपण आशावादी राहू शकतो. त्यादृष्टीने जिल्हानिहाय, कॉलेजनिहाय शाळा-कॉलेजमध्ये टॅलेंट सर्च मोहीम राबवली जायला हवी. तरच देशाला विविध क्षेत्रात खर्‍या अर्थाने प्रगती साधणे शक्य होईल.

 

LEAVE A REPLY

*