Blog : अण्णांचा इशारा आणि वास्तव

0

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपालच्या मुद्यावरून पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. मात्र यावेळी 2011 इतका पाठिंबा अण्णांना मिळणार का, याबाबत साशंकता आहे. सध्या देशभरात नाराजी आहे ती महागाई, बेरोजगारी आणि इतर आर्थिक धोरणांसंदर्भात. अशावेळी अण्णांच्या हाकेला किती जण ओ देतील हे येणारा काळच सांगेल.

अण्णा हजारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी अलीकडेच पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. साधारणत: दोन महिन्यातील हे दुसरे पत्र असावे.

कारण त्यांनी यावर्षी ऑगस्टमध्येदेखील पंतप्रधानांना पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त करण्याच्या दिशेने कोणतीच हालचाल न झाल्याची खंत व्यक्त केली.

शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात स्वामिनाथन समितीच्या अहवालावर अंमलबजावणी न झाल्यानेही नाराजी प्रकट केली. अण्णांनी आपल्या पत्रात कार्यवाही न झाल्यास दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

पत्रात म्हटले की, भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न पाहत आपण (अण्णा हजारे) ऑगस्ट 2011 मध्ये दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलन केले होते. या आंदोलनास अभूतपूर्व आणि ऐतिहासिक पाठिंबा मिळाला होता.

लेखक – प्रा. पोपट नाईकनवरे

या आंदोलनाचा परिपाक म्हणजे संसदेने केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्ताच्या नियुक्तीबरोबरच सिटीझन चार्टरसारख्या महत्त्वाच्या मुद्यावर लवकरात लवकर कायदा करण्याचा निर्णय घेतला होता.

संसदेत अशाप्रकारचा प्रस्ताव आणल्यानंतर आणि केंद्राने लेखी स्वरुपात आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन स्थगित केल्याचा उल्लेख पत्रात केला आहे. मात्र यूपीए सरकारने आश्वासन पाळले नाही आणि विश्वासघात केला.

सध्याचे सरकारदेखील मागील सरकारचेच धोरण अवलंबत आहे. याचाच अर्थ नरेंद्र मोदी सरकारवरदेखील अण्णांनी विश्वासघाताचा आरोप केला आहे.

सध्याच्या सरकारने लोकपालसाठी कोणतीच हालचाल केलेली नसल्याचा उल्लेख त्यांनी वारंवार पत्रात केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रामलीला मैदानावर जाणार असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

याच मैदानावरून देशाला पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देऊ, असे अण्णा हजारे यांचे म्हणणे आहे. यानिमित्ताने अण्णा हजारे यांना 2011 प्रमाणेच पाठिंबा मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भावनाप्रधान व्यक्ती हा या प्रश्नाला कदाचित ‘हो’ म्हणूनच उत्तर देईल. कारण सध्या कोणत्याच स्वरुपाचा भ्रष्टाचार नाही, असे म्हणता येणार नाही.

पण गेल्या काही वर्षांत अण्णांंची उक्ती आणि कृती याच्यात बरीच तफावत असल्याची टीका झाली आहे. अण्णा हजारे आजही भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई करण्याची तयारी करत आहेत.

नागरिकांमध्येही स्थानिक पातळीवर होणार्‍या भ्रष्टाचाराविषयी राग आहे. मात्र तरीही 2011 मध्ये ज्याप्रमाणे अण्णांच्या आंदोलनास पाठिंबा मिळाला हाता तोच उत्साह याहीवेळेस दिसेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

2011 च्या आंदोलनावेळी संपूर्ण देश ढवळून निघाला होता. देशाने ‘दुसरे गांधी’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले होते. प्रसार माध्यमांनीदेखील अण्णांच्या आंदोलनांना चांगले उचलून धरले होते.

माध्यमांचा जबरदस्त पाठिंबा मिळाल्याने देशात अण्णा हजारेंच्या बाजूने वातावरणनिर्मिती झाली होती. परंतु मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

समाजात निर्माण होणार्‍या आंदोलनाला, चळवळीला उच्च पातळीवर नेणार्‍या भावनांनादेखील मर्यादा, वय असते. सभोवतालच्या समस्या कायम असल्या तरी प्रत्येक वेळी भावनांचा पहिल्यासारखाच उद्रेक होईल, असे सांगता येत नाही.

खुद्द अण्णांनीही याचा अनुभव घेतला आहे. मुंबईतील अण्णांचे आंदोलन कशा प्रकारे फसले हे देशानेही पाहिले आहे. कदाचित असेही होऊ शकते की, पहिल्या आंदोलनापेक्षा यंदाचे आंदोलन अधिक तीव्र आणि प्रभावशाली होईल.

परंतु असा अनुभव क्वचितच येतो, असे आंदोलनाच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. आंदोलनकर्ता पहिल्याप्रमाणेच आक्रमक आणि एकसंघ असेल तरच त्याची प्रचिती पुन्हा येऊ शकते.

त्याचबरोबर त्यांचा जनतेशी थेट संपर्कही तितकाच सातत्यपूर्ण असावा लागतो. परंतु अण्णांच्या बाबतीत असे घडताना दिसून येत नाही.

अण्णांच्या आंदोलनाची पहिली उणीव म्हणजे 2011-12 या काळातील आंदोलन करणारे जी मंडळी सोबत होती त्यापैकी आज कोणीच दिसून येत नाही.

प्रसार माध्यमेदेखील अण्णा हजारे यांना पहिल्याप्रमाणे महत्त्व देतीलच याची हमी देता येत नाही. गेल्या काही वर्षातील अण्णांना दिलेले कव्हरेज पाहता प्रसार माध्यमे पूर्वीइतकेच आंदोलनाला महत्त्व देण्याची शक्यता कमीच वाटते.

2011 मध्ये हजारेंच्या आंदोलनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आणि त्यांच्या साथीदारांनीही आंदोलनाला व्यापक रूप दिले. विशेषत: अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि त्यांचे सहकारी. केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तयार केलेल्या पार्श्वभूमीच्या जोरावर अण्णांच्या आंदोलनास अभूतपूर्व यश लाभले होते.

आता केजरीवाल, योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण हे अण्णांचे त्यावेळचे सहकारीदेखील एकमेकांचे मित्र राहिलेले नाहीत. विशेषत: केजरीवाल यांनी लोकपालच्या मुद्यावरून ज्या पद्धतीने कोलांटउड्या घेतल्या त्यावरून जनतादेखील नाराज आहे, हे तितकेच खरे.

2011 मध्ये केजरीवाल म्हणजे अण्णांची अर्धी शक्ती होती. आज तेच केजरीवाल अण्णांना पाठिंबा देऊ शकत नाहीत. राजकीय रणनीतीचा भाग म्हणून पाठिंबा देण्याचा विचार जरी केला तरी अण्णा त्यांचा पाठिंबा घेणार नाहीत.

अण्णांनी पाठिंबा घेतला तर त्यांच्या विश्वासर्हतेला तडा जावू शकतो आणि ते सहानभुती गमावून बसतील.
कारण आजचे चित्र 2011 च्या उलट आहे. आज अण्णा आणि केजरीवाल एकेमकांविरुद्ध आहेत.

आगामी आंदोलनादरम्यान अण्णांना केंद्रावर तोफा डागायच्या आहेत, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक भडीमार केजरीवाल यांच्यावरही करावा लागणार आहे.

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामलीला मैदानावर आंदोलनाची उर्मी बाळगून असलेले अण्णा आता थकले आहेत, हे सत्य नाकारता येत नाही.

2011 मध्ये असणारा जोश आता पुन्हा रामलीला मैदानावर दिसेलच याची खात्री नाही, असे काही जणांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत अण्णांचे उपोषण, आवेशपूर्ण भाषण यावर मर्यादा येऊ शकतात.

तसे पाहिले तर अण्णा यांनी अद्याप आंदोलनाची तारीख निश्चित केलेली नाही. मात्र जोपर्यंत अण्णांचे आंदोलन लांबणीवर टाकले जात नाही, आंदोलनातून माघार घेतली जात घेतली जात नाही किंवा अयशस्वी ठरत नाही तोपर्यंत तर्कवितर्कांना काहीच अर्थ राहत नाही.

या सर्व गोष्टी भविष्यातील वातावरणावर आणि परिस्थितीवर अवलंबून आहेत. कदाचित केंद्र सरकारच्या सध्याच्या भ्रष्टाचारविरोधी केल्या जाणार्‍या उपाययोजनांमुळे अण्णांवर उपोषण करण्याची वेळही येणार नाही.

 

LEAVE A REPLY

*