Blog : दाता तू गणपती गजानन..!

0
गणेश हा बुद्धिदाता आहे. 14 विद्या आणि 64 कला या गणेश उपासनेने लाभू शकतात. आपण स्वतः मातीचा गणपती बनवायचा, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे.
मृत्तिकेच्या गणपतीचे विसर्जन सहज होते आणि ते पर्यावरणाला हानिकारकही नसते. यावरून आपल्या शास्त्रकारांनीही सण-व्रतवैकल्ये-उत्सव यादरम्यानच्या प्रथा-परंपरा सांगताना पर्यावरणाचा विचार केलेला आहे, हे लक्षात येते.
भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन घराघरांत होते. गणेशोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व समजून घ्यायला हवे. शास्त्रकारांनी कोणत्याही मंगल कार्यापूर्वी गणपतीची आराधना करावी, असे सांगितले आहे. कारण तो विघ्नहर्ता आहे.

गणेश ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे प्रत्येक सर्जनशील व्यक्ती किंवा अगदी संत महात्म्यांनीही कलेची साधना, निर्मिती, त्याचे आविष्करण करताना गणेशाची उपासना केली आहे.

गणेशामुळे बुद्धी, ज्ञान मिळते आणि ते व्यक्त करण्यासाठी शारदेची मदत लागते. विद्या दुसर्‍याला देण्याची कला शारदेमुळे मिळते. शारदा ही वाणीची देवता आहे.

लेखक – पं. विद्याधरशास्त्री करंदीकर

म्हणूनच तिला वाक्देवताही म्हणतात. 14 विद्या आणि 64 कला गणेश उपासनेने लाभू शकतात. गणेशाची उपासना करताना अथर्वशीर्षाचे पठण केले जाते.

अथर्वशीर्षातील मंत्रांमध्ये मोठे सामर्थ्य आहे. गणेशही युद्धदेवता आहे. तो युद्धाचा प्रमुख होता. एकवीस गणांचा अधिपती हा गणपती होतो. अशाप्रकारे महागणपत हा लक्ष लोकांचा गट, असे सांगितले आहे.

गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे. याला वरद चतुर्थी असेही म्हटले जाते. धर्मशास्त्रातील आणि पुराणांमध्ये यासंदर्भात अनेक संदर्भ आणि माहिती आढळते.

गणेश चतुर्थीसाठी आपण स्वतः आपल्या हाताने मातीचा गणपती बनवायचा, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे. त्याचबरोबर माती आणून, भिजवून, मूर्ती तयार होण्यापर्यंत गणपतीच्या नावांचे निरनिराळे मंत्र सांगितले आहेत.

या मंत्राचे उच्चारण करत ही मूर्ती घडवली जावी, असे अभिप्रेत आहे. तसेच या मूर्तीची मध्यान्हाला पूजा करून, नेवैद्य दाखवून त्याच दिवशी त्याचे विसर्जन करावे, असा उल्लेख पार्थिव गणेशोत्सव व्रतामध्ये आढळतो.

मात्र आपला समाज उत्सवप्रिय आहे. त्यामुळे दीड दिवस, पाच दिवस गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा रूढ झाली.
वरद चतुर्थीच्या काळात गणपतीची पूजा सिद्धीविनायक किंवा पार्थिव गणेश म्हणून केली जाते.

या दिवशी चंद्रदर्शन करू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे पंचांगामध्ये फक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्र अस्त दिलेला असतो. या दिवशी चंद्रदर्शन झाल्यास त्या व्यक्तीवर चोरीचा आळ येतो, असे सांगितले जाते.

त्यासंदर्भात एक कथाही पुराणामध्ये आहे. भगवान श्रीकृष्णाने या दिवशी चंद्र पाहिला आणि त्याच्यावर स्यमंतक
मण्याच्या चोरीचा आळ आला होता. त्यावर उपाय म्हणून नीतितत्त्व ग्रंथात एक मंत्र सांगितला आहे.

सिंहः प्रसेनमवधीत सिंहो जांबवता हतः। सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्यमन्तकः॥ याचा अर्थ असा की, सिंहाने प्रसेनाला मारले, जांबवंताला मारले. सुकुमारा रडू नको हा स्यमंतक मणी तुझाच आहे.

त्यामुळे या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला चंद्रदर्शन झाले असेल तर तो येणारा आळ टळू शकतो, अशी ही पुराणकथा आहे. ज्योतिषशास्राच्या दृष्टीने चंद्र हा मनाचा कारक आहे.

या दिवशी रवी, चंद्र आणि पृथ्वी यांच्या विशिष्ट प्रकारच्या होणार्‍या रचनेमुळे मनात कुविचार येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊ नये, असे वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येऊ शकेल.

श्रीगणेशाचे वाहन मुषक म्हणजे उंदीर आहे. मुषक वाहन असण्याबाबत अनेक कथा पुराणांमध्ये आहेत. वास्तविक, मोर हेदेखील गणपतीचे वाहनच आहे. म्हणूनच गणरायाला मोेरेश्वर, मयुरेश्वर अशी नावेही आहेत.

पण गणपतीसमोर कधीही मोर हे वाहन ठेवले जात नाही. उंदीरच ठेवला जातो. त्यामागची एक कथा आहे. क्रौंच नावाचा एक गंधर्व होता. इंद्रसभेत उपस्थित असताना त्याचा पाय चुकून वामदेवाला लागला.

त्याने क्रौचाला ‘तू उंदीर होशील’ असा शाप दिला. हा उंदीर थेट पराशर मुनींच्या आश्रमात दाखल झाला. तेथे त्याने जे काही खाण्यासारखे होते ते खाऊन टाकले आणि बाकी गोष्टी कुरतडून टाकल्या.

उंदरापासून सुटका मिळवण्यासाठी पराशर ऋषींनी गणेश उपासना केली. तेथे प्रत्यक्ष गणराय प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या हातातील पाश टाकून उंदराला जेरबंद करून ठेवले. त्यानंतर गणेशाने त्या उंदराला वर मागण्यास सांगितले.

तेव्हा उंदीरमामा गर्वाने आंधळे झालेले होते. त्यांनी गणेशाला उलट प्रश्न केला. ‘तुलाच काही मागायचे असेल तर माग.’ गणपतीने मुत्सद्दीपणाने त्या उंदराकडे ‘तू आजपासून माझे वाहन हो’ असा वर मागितला. अशारीतीने उंदीर हा गणपतीचे वाहन बनल्याची कथा पुराणामध्ये आहे.

आपल्याकडे कृषिप्रधान अर्थरचना आणि समाजरचना आहे. श्रीगणेशाचे रूपही शेतकर्‍यांशी जोडले गेलेले आहे. गणपतीचे कान सुपासारखे आहेत. सूप शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. शेतातून काढणी केलेला भात सुपातून पाखडला जातो.

भाताची लोंबी गणपतीच्या सोंडेसारखी दिसते. गणरायासंदर्भातील अशा प्रकारची अनेक वर्णनेही आपल्याला आढळतात. गणरायाला वाहिल्या जाणार्‍या पत्री म्हणजे आयुर्वेदिक वनौषधी आहेत.

गणपतीला दुर्वा प्रिय आहेत. आयुर्वेदानुसार दुर्वा थंड मानल्या जातात. यासंदर्भातही एक कथा आढळते. अनलासूर नावाच्या राक्षसाने बालरूपातील गणेशाला गिळण्याचा प्रयत्न केला, परंतु गणपतीने विराट रूप धारण केले आणि अनलासुरालाच गिळंकृत केले.

त्यामुळे गणपतीच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. त्याने सर्वांगाला चंदनाचा लेप दिला. तरीही दाह काही थांबेना. तेव्हा देवांनी त्याच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली. त्यामुळे गणपतीला भालचंद्र असे नाव पडले. विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याच्या हाती दिले.

त्यामुळे पद्मपाणी असे नाव मिळाले. भगवान शंकराने आपल्या गळ्यातील नाग गणपतीच्या कमरेला बांधला. वरुणाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला.

तरीही अंगाची लाही थांबेना. इतक्यात काही ऋषीमुनी तेथे आले आणि त्या प्रत्येकाने 21-21 दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली. ती ठेवल्याबरोबर तात्काळ गणपतीच्या अंगाची आग शांत झाली.

त्यामुळे गणपतीला आजही दुर्वा वाहिल्या जातात. वर्षभर दुर्वा दिसल्या नाहीत तरीही पहिला पाऊस पडला की त्या उगवतात. दुर्वा चिरंजीवी आहेत.

दुर्वांसाठी जो मंत्र सांगितला आहे त्यामध्ये दुर्वा दुःस्वप्न नाशिनी आहेत, असे म्हटले जाते. वाईट स्वप्न पडण्याच्या समस्येवर उपाय म्हणून सकाळी दुर्वा खाव्यात.

अशाच प्रकारे इतर प्रत्येक वनस्पतींमध्ये काही ना काही औषधी गुणधर्म आहेत. गणेश चतुर्थीच्या पूजेदरम्यान तुळसही वाहिली जाते. याखेरीज पिंपळ, देवदार, बेल, शमी, दुर्वा, धोतरा, माका, बोर, आघाडा, रुई, मंदार, अर्जुनसादडा, मरवा, केवडा, अगस्ती/हादगा, कण्हेर, मालती/मधुमालती, बृहती, डाळिंब, विष्णुकांत / शंखपुष्पी, जाई या वनस्पतींच्या पत्री गणरायाच्या चरणी भक्तिभावाने अर्पण केल्या जातात आणि गणेशाकडे कृपादृष्टीसाठी आशीर्वाद मागितला जातो.

गणेश विसर्जनाबाबतही शास्त्रकारांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. मृत्तिकेपासून म्हणजेच मातीपासून बनवलेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यास ती विरघळून जाते. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत नाही.

मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या, रसायनांचा वापर केलेले रंग दिलेल्या मूर्तींमुळे पाणी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर एक पर्याय म्हणजे गणेश मंडळांनी उत्सवमूर्ती वेगळी ठेवून दरवर्षी शाडूची मूर्ती वापरावी.

त्यामुळे नदीचे, पाण्याचे आणि पर्यायाने पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. शेवटी कोणताही उत्सव हा मंगलदायी असावा. त्यातील मांगल्य जपणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे.

 

 

LEAVE A REPLY

*