निवडणूक खर्च सादर न केल्याने पारोळा तालुक्यातील जि.प., पं.स.सदस्य अपात्र

0
जळगाव । दि.3 । प्रतिनिधी-जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांसह शिवसेनेचे एक विद्यमान जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती सदस्य अपात्र ठरल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.
आज हा प्रकार उघडकीस आल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दि.17 जुलै रोजी जिल्हाधिकारी किशोर राजे-निंबाळकर यांनी हा निर्णय दिल असून यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांकडून निवडणूक आयोगाने खर्चाचा हिशेब मागितला होता.

जिल्ह्यातील 237 उमेदवारांनी विहीत मुदतीत खर्च सादर केला नाही म्हणून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये त्यांना पाच वर्षासाठी अपात्र करण्यात आले.

या कारवाईत शिवसेनेच्या विद्यमान सदस्यांची गोची झाली. पारोळा तालुक्यातील वसंतनगर-शिरसोदे गटातील जिल्हा परिषद सदस्या रत्ना रोहिदास पाटील व पारोळा पंचायत समिती सदस्या छायाबाई जितेंद्र पाटील विद्यमान असतांनाही अपात्र ठरले.

मात्र या दोन्ही विद्यमान सदस्यांनी खर्च सादर केला नाही. तसेच त्यांना याबाबत नोटीसीद्वारे सुचित करण्यात आले असतांनाही हे दोन्ही सदस्य सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई टळू शकली नाही.

हा प्रकार उघडकीस येताच शिवसेना सदस्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. मात्र प्रशासनाने केलेली कारवाई ही नियमानुसार असल्याचे सुत्रांनी सांगितले. या निर्णयामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

 

LEAVE A REPLY

*