अंबरझरा पाटचारीवर पुल बांधण्यासाठी प्रस्ताव

0
जळगाव । दि.16 । प्रतिनिधी-शहरात मागील आठवड्यात मुसळधार झालेल्या पहिल्याच पावसाने शहरात दाणादाण झाली. काही भागात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होवून नागरिकांच्या घरात पाणी शिरले.
त्यामुळे संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांसह अधिकार्‍यांनी काही भागांची पाहणी करुन वस्तुस्थिती जाणून घेतली.
दरम्यान, अंबरझरी पाटचारीवर दोन छोटे पुल बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करुन जलसंपदा विभागाकडे सादर करण्याची तसेच सम्राट कॉलनी, एकनाथनगरात गटारी बांधण्याची सुचना देखील आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिली.
मनपा आयुक्तांनी मान्सुनपूर्व नाले सफाई करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी आणि प्रभाग अधिकार्‍यांना दिले होते. त्यानुसार नालेसफाई झाल्याचा दावा करुन अधिकार्‍यांनी तसा अहवाल आयुक्तांकडे सादर केला होता.

परंतु मागील आठवड्यात मुसळधार झालेल्या पहिल्याच पावसाने शहरात पुरसद़ृष्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नालेसफाईबाबत आणि स्वच्छतेबाबत साशंकता निर्माण झाली होती.

दस्तुरखुद्द महापौर नितीन लढ्ढा आणि नगरसेवक कैलास सोनवणे यांनीही नालेसफाईबाबत आयुक्तांना पत्रदेवून तक्रार केली होती.

त्या अनुषंगाने शहरातील चारही प्रभांगामध्ये दोन दिवस अधिकार्‍यांसह पाहणी करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. त्यानुसार कानळदा रोडवरील लक्ष्मीनगर, न्यु.बी.जे.मार्केट, सम्राट कॉलनी, रामेश्वर कॉलनी, एकनाथनगरमधील अंबरझरा पाटचारी या भागात आयुक्त जीवन सोनवणे यांनी पाहणी केली.

यावेळी प्रभारी शहर अभियंता सुनिल भोळे, प्रभाग अधिकारी उदय पाटील, सुशिल साळुंखे, आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील, अग्निशमन अधिकारी वसंत कोळी, अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान यांच्यासह त्या-त्या भागातील आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*