कर्जवाटपासाठी सरकारने पैसा उपलब्ध करून द्यावा

0
जळगाव  / शेतकर्‍यांना कर्ज मिळावे ही जिल्हा बँकेचीही भुमिका आहे. परंतु कर्जमाफीच्या आशेमुळे जिल्हा बँकांची वसुली ठप्प झाली. परीणामी कर्जवाटपावर त्याचा परीणाम झाला.
त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जवाटपासाठी सरकारने पैसा उपलब्ध करून द्यावा अशी विनंती मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आ. एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकार परीषदेत दिली.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा अध्यक्षा अ‍ॅड. रोहीणी खडसे-खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. सभेनंतर आयोजीत पत्रकार परीषदेत माहिती देतांना आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, जिल्हा बँकेकडे 500 कोटी रूपये कर्जाची वसुली झाली आहे.
त्यापैकी 200 कोटी रूपयांचे कर्जवाटप जिल्हा बँकेने केले आहे. बँकेला कर्जवाटपासाठी 2 हजार कोटीचे उद्दीष्ट असल्याने 1500 कोटी रूपयांची तफावत पडत आहे.
जिल्हा बँक थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्ज देऊ शकत नाही. पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळेल अशी आशा आहे.
त्यासाठी एक लाख रूपयेपर्यंत कर्ज असलेल्या शेतकर्‍यांच्या याद्याही शासनाने मागविल्या आहेत. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांना कर्ज मिळावे यासाठी सरकारने 1500 कोटी रूपये उपलब्ध करून द्यावे यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाणार आहे.

उद्दीष्ट वर्ग करण्याचा पर्याय
जिल्हा बँकेला कर्जवाटपासाठी सरकार जर पैसाच उपलब्ध करून देणार नसेल तर जिल्हा बँकेला कर्जवाटपाचे जे उद्दीष्ट ठरवुन देण्यात आले आहे ते इतर राष्ट्रीयकृत बँकांना वर्ग करावे अशी मागणीही आ. एकनाथराव खडसे यांनी केली.

भुमिपुत्रांसाठी विशेष परवानगी द्या
जिल्हा बँकेला 500 कर्मचारी भरतीची परवानगी मिळाली असुन शासनाने चार एजन्सी सुचविल्या आहे. सद्यस्थितीला बँकेला 250 कर्मचारी भरती करता येणार आहे. मात्र या भरती प्रक्रियेत केवळ जळगाव जिल्ह्यातील भुमिपुत्रांना संधी मिळावी यासाठी विशेष परवानगी सरकारने द्यावी. यासंदर्भात सहकार मंत्र्यांशीही चर्चा करणार असल्याचे आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*