तटरक्षक दलाने 7 मच्छिमारांना वाचवले

0
मुंबई / मंगलोर किनार्‍यानजिक उसळत्या लाटांमुळे पाणी भरल्यामुळे बुडू लागलेल्या मंजेश्वरी या मच्छिमार नौकेवरील मच्छिमारांची तटरक्षक दलाच्या पथकाने बुधवारी सकाळी सुटका केली व त्यांचे जीव वाचविले.
आयसीजीएस राजदूतने 11.15 वाजता नवे मंगलोर बंदरात प्रवेश केला व तेव्हा सुटका करण्यात आलेल्या मच्छिमारांना तातडीने वैद्यकीय मदत पुरविण्यात आली.
त्या सर्वांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे तटरक्षक दलातर्फे सांगण्यात आले.

मंजेश्वरी ही 27 फुटी मच्छिमार नौका जुन्या मंगलोर बंदरातून सकाळी नऊ वाजता मालपे बंदराकडे जाण्यासाठी प्रयाण केले.

परंतु अवघे तीन किलोमीटर अंतर कापल्यावरच उसळत्या लाटांमुळे मंजेश्वरी नौकेस मार्गक्रमणा करणे कठीण होऊ लागले.

नौकेत पाणी भरू लागल्यामुळे ती समुद्रात बुडण्याचेच संकट ओढवले. तेव्हा नौकेवरील मच्छिमारांनी बचावासाठी धावा सुरू केला.

सकाळी 9.25 वाजता नवे मंगलोर पोर्ट ट्रस्ट येथील संपर्कयंत्रणेद्वारे भारतीय तटरक्षक दलाच्या पनंबूर, मंगलोर येथील मुख्यालयास या घटनेची वर्दी देण्यात आली.

तेव्हा तटरक्षक दलाच्या ऑपरेशन टीमने तातडीने आयसीजीएस सावित्रीबाई फुले ही गस्तीनौका मंजेश्वरी नौकेच्या मदतीसाठी धाडण्याचे निर्देश दिले.

याच परिसरात असलेली आयसीजीएस राजदूत या गस्तीनौकेसही बचावकार्यासाठी पाठविण्यात आले.

10 वाजून 49 मिनिटांनी आयसीजीएस राजदूत घटनास्थळी पोहोचली व तिने मंजेश्वरी नौकेवरील सर्वच्या सर्व 7 मच्छिमारांची सुखरुप सुटका केली.

तोपर्यंत मंजेश्वरी ही नौका अर्धी पाण्यात बुडाली होती व जवळपास पाण्याखाली जाण्याच्याच बेतात होती.

LEAVE A REPLY

*