राज्यात कधीही मध्यावधी निवडणूक

0
धुळे  / राज्यात मध्यावधी निवडणूकांची शक्यता नाकारता येत नाही. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत मध्यावधी निवडणुकांची घोषणा होऊ शकते, असे संकेत माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी दिले.
राज्य सरकारने जीएसटीसाठी घेतलेले विशेष अधिवेशन आटोपून खडसे आज (दि. 22) मुंबईहून जळगावकडे जात असताना धुळ्यात काही वेळ थांबले.
त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यात दि.25 मे पासून शेतकरी शिवार संवाद यात्रा काढण्यात येत असून शहादा तालुक्यातील खेड येथून ही यात्रा निघणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे यात्रेत सहभागी होणार असल्याचेही आ. खडसे म्हणाले.

यावेळी बोलताना आ. खडसे म्हणाले की, पक्षाच्या एका बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याबाबत आम्हाला कल्पना दिली आहे. गुजरातमध्ये आगामी काळात विधानसभेची निवडणूक आहे.

त्याचवेळी महाराष्ट्राचीही निवडणूक होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्याच्या निवडणुका एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात राज्य सरकारला तीन वर्षे पुर्ण झाली आहेत. मात्र निवडणुकीला सामोरे जाताना जनतेच्या प्रश्नांचे समाधान करता येईल, अशी कामगिरी सरकारकडून झालेली दिसत नाही, अशी खंत व्यक्त करून आ. खडसे म्हणाले की, इंदिरा गांधी यांनाही आपल्या राजकीय जीवनात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आगामी काळात राजकारणात काहीही घडू शकते, असे सुचक विधानही त्यांनी यावेळी केले.

आ. खडसे पुढे म्हणाले की, राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. पक्षाची अंतर्गत बांधणी जोमाने सुरू आहे. त्यामुळे राज्यात विधानसभेची मध्यावधी निवडणूक केव्हाही लागू शकते.

डिसेंबर महिन्यात मध्यावधीची दाट शक्यता आहे. पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याबाबत आम्हाला माहिती दिली आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीबरोबर राज्य विधानसभेची निवडणूक शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातली स्थिती ‘आलबेल’ राहिली तर दोन वर्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुक एकत्र होऊ शकते.

मात्र मध्यावधी झाली तर जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देता येतील, अशी ठोस कामगिरी करावी लागेल, असेही ते म्हणाले. पक्षांतर्गत स्थिती मांडताना आ. खडसे म्हणाले की, पक्षात कोणतेही वाद नाहीत.

भांड्याला भांडे प्रत्येक ठिकाणी लागत राहते. आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी हे विरोधक म्हणून आमच्यासमोर होते. मात्र आता तेच संपले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत अधूनमधुन कुरबुरी होत असतात, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*