मनुदेवी परिसरात लैला मजनुंचा उपद्रव

0

चिंचोली, ता. यावल | वार्ताहर :  गेल्या पाच ते सहा दिवसापुर्वीच महाराष्ट्रातील अंबोली येथील धबधब्यावरून दारूच्या नशेत तर्ररर झालेल्या दोन तरूणांचा झोल जावुन दरीत कोसळल्याने मृत्यु झाला.तशीच घटना सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवीच्या सातपुड्याच्या जंगलातील धबधब्यावर घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या परीसरात मोठ्या प्रमाणात व सहज मिळेल अशा रितीने दारू विक्री होत असुन त्याकडे यावल पोलीस जाणीवपुर्ववक दुर्लक्ष करीत आहे. सातपुडा निवासिनी मनुदेवी हे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळापैकी एक निसर्गरम्य ठिकाण आहे. याठिकाणी जिल्ह्यातीलच नव्हे तर आख्खा महाराष्ट्रातुन भाविक व पर्यटकांची मोठी हजेरी असते. त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्याचीही मोठी गर्दी याठिकाणी असते.

सातपुडयाचा घनदाट जंगल व निसर्गरम्य ठिकाण असल्याने याठिकाणी लैला मजनुचाही मोठा वावर असतो.अनेक वेळा लैला मजनु बेजबाबदारपणे वागुन परीसरातील वातावरण खराब करीत असतात. समोरच्याला लाजवेल असे कृत्य करीत कुणालाही न घाबरता अश्लिल चाळे करतांना दिसुन येतात.त्यामुळे सर्वसाधारण भाविक व पर्यटकांमधुन नाराजी व्यक्त केली जात आहे.

बर्‍याच वेळा काही पर्यटक दारूच्या बाटल्या घेवुनच या परीसरात दारू पिताना दिसुन येतात. त्यामुळे तरूणवर्गामध्ये जोश निर्माण होवुन असे तरूण विनाकारण एकमेकासोबत वाद घालतात. याचे पर्यावसन हाणामारीत होते. हे वाद मनुदेवी परीसरातील दुकानदार सोडवायला गेल्यास त्यांच्याशीही वाद घातला जातो.

त्यामुळे त्यांना शेवटी मनुदेवी संस्थेशी संपर्क साधुन समज देवुन सोडुन देण्यात येते.

धबधब्याकडे जाण्याचा मार्ग बंद

वारंवार होणारे तरूण तरूणीचे वाद तसेच लैला मजनुचा वावर यामुळे धबधब्यावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अखेर मनुदेवी संस्थेने तिथे जाण्याचाच मार्ग बंद केला आहे.

त्यामुळे आता काही लैला मजनु मंदिराच्या अलीकडेच सातपुड्याच्या दर्‍या खोर्‍या चढुन उंच उंच पर्वतावर चढतात. याचे पर्यावसन एखादया दुर्घटनेत झाल्यास याला जबाबदार कोण राहणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात असुन पोलीसांनी याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

मानापुरीजवळ हवा चेक नाका

गेल्या अनेक वर्षापासुन मानापुरी गावाजवळ म्हणजे जेथुन सातपुड्याचा प्रारंभ होतो तेथे चेक नाका बसविलेले होते. या चेक नाकाच्या माध्यमातुन प्रत्येक वाहनांची नोंद याठिकाणी केली जात होती. पंरतु आता हे चेकनाका सध्या बंद आहे. मनुदेवी व यावल वनविभागाने संयुक्तपणे याठिकाणी चेक पोस्ट नाका बसविल्यास प्रत्येक वाहन नंबरची नोंद केल्यास काहीअंशी या घटनांवर आळा बसेल.

मनुदेवी परीसरात पोलीस चौकीची गरज

सातपुडा परीसरात व मनुदेवी मंदिर परीसरात नेहमीच लैला मजनुचा धुमाकुळ सुरू असतो.या श्रीक्षेत्रावर येणारे सर्वसामान्य भाविकांना यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो.

पोलीसांनी ही येथे लक्ष देवुन अश्या लैला मजनुवर प्रतिबंध लावुन त्यांच्यावर कार्यवाही झाल्यावरच येथे यावर आळा बसु शकतो. अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे.मनुदेवी सेवा प्रतिष्ठाननेही कडक कायदा करून दारू पिवुन धिंगाणा करणार्‍या व धुमाकुळ घालणार्‍या लैला मजनुचा कायमचा प्रतिबंध करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लक्ष कोण देणार ?

येथे येणारे लैला मजनु हे गर्भश्रीमंत असल्याने तसेच यातील बरेचजण हे शासकीय अधिकारी, पोलिस बॉईज असल्याने त्यांच्या विरोधात पोलिसच कारवाई करत नाहीत. त्यामुळे हे लैला मजनु दिवसेंदिवस सैराट होत त्यांच्या अश्‍लिल चाळ्यांचा उद्रेक होत असून मनुदेवीचे पवित्र वातावरण मात्र दूषीत होत आहे.

LEAVE A REPLY

*