जीवाचे मैत्र…

0

श्री.पु.ल.देशपांडेंनी केलेली मैत्रीची व्याख्या आज प्रकर्षाने तंतोतंत खरी झाल्यासारखी वाटते.

‘रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही, एवढंच कशाला रोज बोलण व्हावं अस ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि याची तुला जाणिव असणं ही झाली मैत्री’

वरील ओळी वाचल्यानंतर तुम्हाला सुध्दा तुमच्या मित्र मैत्रीणींची आठवण नक्कीच झाली असेल.

शाळा कॉलेज सोडून १७-१८ वर्षे झालीत. झपाट्यान काळ बदलला. लग्नानंतर सगळे मित्रमैत्रिणी विखुरले. इतक्या वर्षात बर्‍याच जणांची एकदाही भेट झाली नाही. पण फेसबुक व्हॉटसऍफ मुळे सगळी विखुरलेली मैत्री एकत्र आली.

झाडाला नवी पालवी फुटावी त्याचप्रमाणे सगळ्यांच्या मनाला एक नवा बहर आला. आणि विशेष म्हणजे एकमेकांच्या बोलण्यातून असे जाणवल की कोणी कोणाला विसरलेले नव्हते. शाळा-कॉलेजातलं जगलेलं आयुष्य जसच्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलं.

काडीमात्रही कोणाच्या स्वभावात बदल झाला नाही. तीच आपुलकी आणि जिव्हाळाही तसाच…
प्रत्येकाला जगण्यासाठी अनेक नात्यांची गरज असते. त्यात मोठा वाटा मैत्रीचा असतो. हे नातं जपतांना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं, तेव्हाच ते नाव बहरतं… मैत्रीच्या नात्याचा हा जन्मापासून सुरू होणारा प्रवास तारूण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो आणि मागे वळून पहावे तेव्हा मन भरून येते.

मैत्रांसोबत केलेली मजा, मौज आठवते. डोळ्यातून धारा आपोआप येतात, त्याच क्षणी तोच मैत्र धारा पुसण्यास आला. तर त्यापेक्षा अपार सुख ते काय असेल…

मैत्रीला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ती कधीही कोणाशीही होवू शकते. आपल्या मनातलं गुपित सांगतांना लाज, संकोच, भिती, दडपण वाटणार नाही तोच आपला खरा मैत्र.

LEAVE A REPLY

*