मैत्रीची दुनियादारी

0
‘यारा…. यारा…. फ्रेंडशीपचा खेळ सारा…’ असे म्हणत आपल्या जीवनाची दुनियादारी पुर्ण करीत असताना ‘मैत्री’ या नावाला अनन्यसाधारण महत्त्व असते. कारण ‘मैत्री’ हे दोन शब्द उच्चारताच हृदयाचा कोंदनामध्ये आठवणींच्या मखमली कपड्याने गुंढाळलेला फोटो आपल्या डोळ्यांसमोर येतो. तर फोटोच्या संदर्भातील सर्व नव्या जुन्या आठवणी एका चित्रपटाप्रमाणे हृदयात साठल्या जातात.

एवढेच नव्हे तर त्या आठवणीमध्ये गुंतून जावून आपल्या मनाला विचाराल तर हे डोळे कधी ओले होतात हे आपणासही समजत नाही. मग तो फोटो त्याचा असो वा तिचा. असे असतांनाच नेमकी हीच प्रतिमा आपल्या नयनामध्ये आपण का साठवून ठेवली आहे? याच प्रतिमेचा आठवणींनी आपल्या डोळ्यांच्या पापण्या का ओल्या व्हाव्यात, असा प्रश्‍न कधी आपल्या मनाला विचारला तर हे आठवणींनी भारावलेले मन सांगेल की हीच ‘खरी मैत्री’ आहे.

जी तुझ्या सुख, दु:खाच्या क्षणामध्ये अगदी एकरूप होवून तुला मदतीचा हात देत असते, वेडे उगाच नाही कुणाच मन कुणासाठी विरघळत आणि कुणाचे डोळे कुणासाठी अश्रू ढाळत. हीच खरी किमया असते या मैत्रीच्या नात्याची.

आपल्या जीवनाची पावल पडू लागली की आपण मैत्री या बंधनात अडकतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या मैत्रीचा बगीचा वेगळ्याच दुनियादारीत फुलत असतो. त्यामध्ये शाळेतील मैत्री, कॉलेज जीवनातील मैत्री अन संकटसमयी धावून येणारी मैत्री याचा समावेश आहे.

शाळेतील मैत्री खेळण्याबागडण्याचा आनंद देते तर कॉलेजच्या मैत्रीची गोष्टच निराळी असते. तिची मला खुप काळजी वाटतेयं. तु पोहोचलास का घरी? तु जेवलीस का? ती आज कॉलेजला आलीच नाही, तु आजारी आहेस का? काही मदत लागली तर फोन कर, अरे… यार मैत्रीसाठी काय पण… अशा एक ना अनेक वाक्यांनी कॉलेज जीवनातील मैत्रीचे स्वरूप दिसून येते.

कॉलेज कट्ट्यावरील मित्र-मैत्रीणींचे चाललेली एकमेकांबाबतची विचारपुस मैत्रीच्या भावनांना आपलेपणाचा सुगंध कधी दरवळून टाकते हे आपल्यालाही कळत नाही. तर जीवापाड प्रेम करणार्‍या मित्रांच्या मनातील हितगुज जाणून घेत असतांना जीवनातील सुख दु:खाचा सारीपाट नेहमीच ठेंगणा वाटतो. पण या मैत्रीची ताकद म्हणावी तरी किती? जीवलग मित्रासाठी मित्राने प्राण पणाला लावल्याची उदाहरणे कमी आहेत का?

‘मैत्री’ ही नेमकी हात आणि डोळ्यासारखी आहे. जर हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते आणि डोळे पुसण्यासठी तेच हात पुढे येतात. मित्राच्या कोणत्याही दु:खाच्या मदतीसाठी मैत्रीचेच हात पुढे येतात. या सर्वांमद्ये मित्र किंवा मैत्रीणींविषयी असणारी निठळ, स्वच्छ, निस्वार्थी भावना आपल्या हृदयामध्ये गोडवा निर्माण करून जाते.

मैत्रीतील ते ‘रूसण’ हसणं आणि उगाचच कशावरून भांडण हे या मैत्रीमध्ये अधिकच रंग निर्माण करून जातात. पुन्हा त्या मित्रांच्या अथवा मैत्रीणींच्या आठवणींमध्ये स्वप्नांची दुनिया रंगवितांना आपणच आपल्या मनाला दोष दिल्याशिवाय राहत नाही.

कारण स्वत:पेक्षा आपलीच जास्त काळजी घेणार्‍या मित्राचं मन आपण दुखावलेलं असत. आयुष्यामध्ये कोणतीही संकटे आली तरी आपण ती मैत्रीच्या आधाराने सर करून त्या संकटावर मात करीत असतो. यामागे मैत्रीतून मिळालेला आधार आणि तितक्याच उन्मेषाचा असलेला विश्‍वास हा महत्त्वाचा ठरतो. तिचा चुकलेला मार्ग तो सावरतो तर त्याच्या चुकांवर चार शब्द सुनावण्यासाठी तीही मागे पुढे पाहत नाही.

मैत्रीत असतो ना एवढा हक्क ! त्याला आणि तिला अशीच ही मैत्री जीवाला जीव देणारी, आयुष्याच्या प्रत्येक उंबरठ्यावर प्रत्येक क्षणाला एकमेकांच्या मदतीला धावणे, सुखाचे क्षण द्विगुणीत करून दु:खाच्या समयाला विश्‍वासाचा आधार देते.
मित्र हा सुख दु:खात वाटणारा… संकट प्रसंगी मदतीला धावणारा… विवाहाच्या दिवशी मिरवणुकीत खांद्यावर घेवून नाचणारा… तर आयुष्याच्या संध्याकाळी तिरडीला खांदा देत स्मशानापर्यंत साथ देणारा.

प्रेमा प्रमाणे मैत्रीला दहाही दिशा माफ असतात. मैत्री करायला वय, वेळ, स्थळ यांच्या कशाच्याच मर्यादा येत नाहीत. आणखी एक महत्वाचे म्हणजे ज्याला मैत्रीच नाही तो माणूसच नाही.

‘मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी एकदाच बरसून थांबणारी
मैत्री असावी रिमझीम सरी सारखी
मनाला सुखद गारवा देणारी.

LEAVE A REPLY

*