एकच मिशन, मराठा आरक्षण

0
जळगाव । दि.4 । प्रतिनिधी-मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत दि.9 रोजी महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या महामोर्चाच्या जनजागृतीसाठी शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या जयघोषात परिसर दणाणुन गेला. रॅलीत सुमारे 400 ते 500 मोटार सायकलींचा समावेश होता.

मराठा क्रांती मोर्चातर्फे शहरातील काव्यरत्नावली चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आणि भगवा झेंडा दाखवून मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली.

यावेळी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, किरण साळुंखे, सुरेश पाटील, विनोद देशमुख, राम पवार, किरण बच्छाव, सुरेंद्र पाटील, दिपक सुर्यवंशी, राजेश पाटील, योगेश पाटील, रवि देशमुख, श्रीराम पाटील, बाळासाहेब सुर्यवंशी, अ‍ॅड.स्वाती निकम, भारती जवरे, सुषमा इंगळे, सुवर्णा जवरे, डॉ.राजेश पाटील, संदेश भोईटे, पियुष पाटील, देवेंद्र मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. मोटारसायकल रॅलीत तरुणांसह महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणला
मराठा क्रांती मोर्चातर्फे शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान, ‘एक मिशन, मराठा आरक्षण’, ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आम्ही लढलो मातीसाठी, एक लढा जातीसाठी’, ‘आता मुंबई काबीज करायची’, ‘तुमचं आमचं नातं काय’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘भिक नाही हक्क मागतोय’ यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणला होता.

मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष
काव्यरत्नावली चौकापासून आकाशवाणी चौक, जिल्हा बँक, आयएमआर कॉलेज, ख्वॉजामियाँ चौक, नेहरु चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, शिवतीर्थ मैदान, बसस्थानक, स्वातंत्र चौक, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे, काव्यरत्नावली चौकात मोटारसायकल रॅलीची सांगता झाली. या मोटारसायकल रॅलीने तसेच मोठमोठे भगवे ध्वज लक्ष वेधून घेत होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या रॅलीद्वारे दि.9 रोजी मुंबईत होणार्‍या महामोर्चासाठी जनजागृती करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*