व्हायोलिन वादनासाठी कृत्रिम हाताची निर्मिती

0
न्यूयॉर्क | वृत्तसंस्था :  अमेरिकेत एका चिमुकलीला व्हायोलिन वाजवता यावा, यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कृत्रिम हात तयार केला. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षाचा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प देण्यात आला होता.

व्हर्जिनिया राज्यातील जॉर्ज मॅसन युनिव्हर्सिटीत शिकणार्या अब्दुल गौडा व त्याच्या सहपाठी विद्यार्थ्यांनी ही कमाल करून दाखवली आहे. इसाबेला निकोला या १० वर्षांच्या मुलीसाठी त्यांनी हा हात तयार केला.

इसाबेलाला व्हायोलिन वादन शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र, तिचा उजवा हात जन्मत:च छोटा होता आणि डावा हात तर नव्हताच.  इसाबेला ही आयर्लंड क्रीक एलिमेंटरी स्कूल या शाळेत शिकते.

शाळेतील संगीत शिक्षकांनी तिच्यासाठी प्रोस्थेटिक हात बनवला होता. परंतु, हा हात जड होता. त्यामुळे या शिक्षकाने या विद्यापीठाची मदत मागितली होती, कारण तो तिथेच शिकला होता.

त्याच वेळेस गौडा व त्याचे मित्र प्रकल्पाच्या शोधात होते. त्यांना पदवी मिळविण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक होते.‘याचा आमच्यावर खूप दबाव होता.

एक लहानगी मुलगी आमच्यावर विसंबून होती आणि परिणाम दाखवण्याची अपेक्षा आमच्याकडून होते,’ असे गौडा याने सांगितले. मोना एल्खोली, एव्हा नोव्होसेल्स्की, राचा साल्हा व यासेर अल्हिंदी या सहकार्‍यांसोबत गौडा याने हे आव्हान स्वीकारले.

या विद्यार्थ्यांनी तयार केलेला हात नुकताच इसाबेलाला लावण्यात आला. इसाबेलाच्या इच्छेप्रमाणे त्याचा रंग गुलाबी करण्यात आला आहे.

त्यासाठी या विद्यार्थ्यांनी ३-डी प्रिंटरचा वापर केला. हात बसवल्यावर तिने व्हायोलिन वादन केले.

LEAVE A REPLY

*