शहरात साथीच्या आजाराचा फैलाव

0
जळगाव । दि.21 । प्रतिनिधी-शहरात अस्वच्छता असल्यामुळे साथीचा आजाराचा फैलाव होत आहे. अनेक भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले असतांनाही मनपा प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने मनसेचे नगरसेवक बंटी जोशी यांनी स्थायी समितीच्या सभेत संताप व्यक्त केला.
मनपाची स्थायी समितीची सभा सभापती डॉ.वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, उपायुक्त चंद्रकांत खोसे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मकांत कहार, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच बंटी जोशी यांनी जय नगर येथे डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच शहराच्या अन्य भागांमध्येही साथीच्या आजाराचा फैलाव होत असून आरोग्य विभागाकडून धुरळणी व अबेटींग केले जात नसल्याची तक्रार केली.

यावर आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी जेथे रुग्ण आढळतात तेथेच धुरळणी केली जात असल्याचे सांगताच बंटी जोशी व सभापती डॉ.वर्षा खडके यांनी संताप व्यक्त केला.

25 कोटी निधीतून कोणती होणार कामे
गटारींच्या कामांबाबत मुद्दा उपस्थित झाल्यानंतर 25 कोटींच्या निधीतून कोणती कामे करायची. याबाबत पृथ्वीराज सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केला.

स्थायी समिती सदस्य संतप्त
प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करुन देखील दखल घेत नसल्याने उपस्थित सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते. गायत्री शिंदे यांनी वार्डातील सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँक खाली करण्याबाबत, ज्योती इंगळे, बंटी जोशी, उज्वला बेंडाळे यांनी रस्तातील खड्यांबाबत तर चेतन शिरसाळे, नितीन बरडे यांनी जीपीएस यंत्रणेत घोळ असल्याबाबत सभागृहात तक्रारी केल्यात.

आरोग्य अधिकार्‍यांची उडावाउडवी
नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी त्यांच्या वार्डातील कंटेनर उचलून नेल्याबाबत मागील सभेत कारवाई करण्याचे सांगितले. मात्र प्रशासनाने अद्यापही कारवाई न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कॅरीबॅग बंदीची मोहीम अद्यापपर्यंत राबविली गेली नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. ज्योती इंगळे आणि नवनाथ दारकुंडे यांनी त्यांच्या वार्डात साफसफाई होत नसल्याचे सांगितले. यावर आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सभापती डॉ.वर्षा खडके यांनी त्यांना चांगलेच खडसावले.

 

LEAVE A REPLY

*