कुर्‍हा येथील शाळेत खाजगी वाहनातून पोषण आहाराचा पुरवठा

जळगाव |  प्रतिनिधी :  बोदवड तालुक्यात कुर्‍हा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज चक्क खाजगी वाहनातून पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आला. पुरवठादाराने आपल्या चाकीतून येवून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह समक्ष माल बदलवून दिला.

जिल्ह्यातील १३ शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार आढळून आल्याने सीईओंच्या आदेशान्वये संपुर्ण जिल्ह्याभरात चौकशी सुरु आहे. तक्रारदार पल्लवी सावकारे यांच्या मागणीनुसार निकृष्ट आहार बदलून त्याठिकाणी नवीन धान्यांदीचा पुरवठा केला जात आहे.

मात्र नव्याने करण्यात येत असलेल्या धान्यांदी देखील निकृष्ट आढळून येत असल्याची तक्रार आहे. दरम्यान पुरठादाराने पुन्हा एकदा नियमाचे उल्लंघन केले आहे. पुरवठादाराकडून चक्क खाजगी चारचाकी कारमधुन पोषण आहार धान्यांदीचा पुरवठा केला जात आहे. कुर्हा येथे पुरवठादाराकडून खाजगी वाहनाने धान्य पुरवठा केला जात असल्याचे आढळून आले. जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी शाळेत जावुन वाहनातील धान्यांची तपासणी केली.

याबाबत उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सदस्य जयपाल बोदडे यांनी सीईओं यांची भेट घेत तक्रार केली. यावेळी शिक्षण सभापती पोपट भोळे उपस्थित होते. पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे उघड झाल्यानंतर तक्रारदारांनी चौकशीची मागणी करत सातत्याने पाठपुरवा सुरु केला आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत देखील हाच विषय विशेष गाजला. यावेळी ठेका रद्द करुन प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशीच्या मागणीचा ठराव पारीत करण्यात आला आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे स्वतःठरावाची शहानिशा करुन मुख्यसचिव यांच्याकडे पाठविणार आहे.

पुरवठादारांकडून नियमाचे उल्लंघन

शालेय पोषण आहार पुरवठा करारात धान्य पुरवठा करणारी वाहन ही शासकीय असायला हवी व या वाहनावर शासनाचा हुद्दा असणे गरजेचे असल्याचे नमुद आहे. खाजगी वाहनाने पुरवठा करणे कराराचा भंग करणे असून खाजगी वाहनाने पुरवठा करुन पुरवठादाराने नियमाचे उल्लंघन केले आहे.

पुरवठादारावर कारवाई करावी अशी मागणीही तक्रारदार सावकारे यांनी केले आहे. पुरवठादाराकडून खाजगी वाहनाने पुरवठा करण्याचा दुसरा प्रयत्न आहे

ठेकेदाराची बिले थांबविण्याची मागणी

गेल्या पंधरा दिवसापासुन पोषण आहार प्रकरण उघड झाल्यानंतर चौकशी सुरु आहे. अद्यापही चांगल्या प्रतिचा धान्य पुरवठा होत नसून चौकशी सुरु आहे.

चौकशी सुरु असल्याने पुरवठादाराला देयक रक्कम देण्यात येऊ नये अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सदस्य जयपाल बोदडे यांनी सीईओ आणि शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांच्याकडे केली.

LEAVE A REPLY

*