रक्तपेढी स्वयंपूर्ण व्हावी – जिल्हाधिकारी

0

जळगाव / जिल्ह्यातील गरजू रुग्णांना आवश्यक रक्त पुरवठा उपलब्ध व्हावा, याकरीता रेडक्रॉस रक्तपेढी स्वयंपूर्ण व्हावी यावर आपण भर देणार असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी तथा जिल्हा रेडक्रॉसचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी दिले.

जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त काव्य रत्नावली चौकात भाऊंचे उद्यान परिसरात सेवाकलाविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी निंबाळकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर अप्पर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग, पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, केशव स्मृतीप्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, रेडक्रॉस जळगावचे उपाध्यक्ष गनी मेमन, स्वामी रेणापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान मान्यवरांनी कोर्‍या कॅन्व्हासवर रंगांची उधळण करुन सेवाकलाविष्कार या उपक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर रक्तदानाचे महत्व सांगणार्‍या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी सेवाकलाविष्कार उपक्रमात जिल्ह्यातील 200 हून अधिक कलाशिक्षकांनी 1 हजार फूट लांब कॅन्व्हॉसवर आपली कला साकार केली.

हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी जळगावकर नागरिक, कलाप्रेमी आणि रक्तदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

यानिमित्त शाळकरी मुला मुलींसाठी रंगभरण स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.

उद्घाटक,चित्रकार सेवाकलाविष्कारचे चित्रकलाकार,चित्रकला विद्यार्थी व जमलेले मान्यवर नागरिक यांच्या हस्ते यावेळी आकाशात शेकडो बलून सोडण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रसन्न रेदासनी यांनी केले तर सूत्रसंचालन राजेश यावलकर यांनी केले. यशस्वीतेसाठी विनोद बियाणी, उज्ज्वला वर्मा, जैन स्पोर्टस चे फारुख शेख आदींनी परिश्रम घेतले.

चित्रकलेतून जनजागृती
जागतिक रेडक्रॉस दिनानिमीत्त आयोजीत करण्यात आलेल्या सेवाकलाविष्कार कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलावंतांनी रक्तदान करा, पाणी वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, रक्तदान हेच श्रेष्ठदान, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्त्री भू्रण हत्या थांबवा यासह समाज प्रबोधन करण्यासाठी चित्ररेखाटले होते. त्यातूनच जनजागृती करण्यात आली.

चित्र रेखाटण्यासाठी उत्सफुर्त प्रतिसाद
रेडक्रॉसतर्फे आयोजीत करण्यात आलेल्या सेवाकलाविष्कार कार्यक्रमात चित्र रेखाटण्यासाठी शहरातील नामांकित चित्रकार तसेच सर्व शाळा महाविद्यालयातील व चित्रकलेची आवड असणार्‍या चित्रकारांनी चित्र रेखाटण्यासाठी उत्सफुर्त प्रतिसाद दिला होता.

LEAVE A REPLY

*