अग्रलेख : शिक्षणाची ‘विनोद’कथा !

0
पुरोगामी महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरण नेमके कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे ते भल्या-भल्यांना समजेनासे झाले आहे. नवनव्या प्रयोगांच्या घोषणांचा झपाटा चालू आहे.

कधी अभ्यासक्रमात तर कधी परीक्षा पद्धतीत बदल घडवले जात आहेत. शिक्षकांनाही प्रशिक्षित केले जात आहे. एवढे सगळे कशासाठी? महाराष्ट्राच्या सत्तेत झालेला बदल निदान शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत तरी जनतेला जाणवावा हा एक अट्टाहास यामागे असावा का?

बरे, या सगळ्या उलाढालीतून राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा याचे मात्र कोणालाच भान नसावे हे राज्याचे दुर्दैव! राज्याच्या शिक्षणमंत्र्यांचे याबाबत काय मत असावे? कदाचित मत असेल वा नसेलही. प्रयोगामागून प्रयोग होत असले तरी ते फारसे फलदायी ठरल्याचे जाणवत नाही.

एवढे तरी शिक्षणमंत्र्यांच्या लक्षात येत असेल का? प्रयोगांच्या चरकात विद्यार्थी मात्र पिळून निघत आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक असे सर्वच घटक संभ्रमित असले तरी शिक्षण खात्यातील प्रयोगशील ‘विद्वान’ उच्चपदस्थांना त्याचे काहीच सोयरसुतक आढळत नाही.

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नेमके कुठे आणि कोणते उपचार केले पाहिजेत याबद्दल तेच संभ्रमात असावेत का? म्हणून एखाद्या नवख्या डॉक्टरने रुग्णाला बरे करण्यासाठी वेगवेगळे उपचार करू पाहावेत, तसे काहीतरी शिक्षण खात्यातील शिक्षणतज्ञ करत असावेत.

आणखी एक नवा प्रयोगवजा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा बंद होेणार आहे. हल्ली तोंडी परीक्षांचा वापर विद्यार्थ्यांना गुणांची खिरापत वाटण्यासाठी होतो असा साक्षात्कार मंडळाला झाला.

म्हणून भाषा विषयांची तोंडी परीक्षा बंद करून शंभर गुणांची लेखी परीक्षा फक्त यापुढे घेतली जाईल. नववीसाठी हा निर्णय याच वर्षात अमलात आणला जाईल तर दहावीच्या बाबतीत तो पुढच्याच शैक्षणिक वर्षात लागू होणार आहे.

एक ‘खिरापत’ बंद केली तरी सीबीएसई आणि तत्सम परीक्षा मंडळांच्या तुलनेत राज्याच्या विद्यार्थ्यांची ‘गुण’वत्ता उणी पडू नये म्हणून हल्ली परीक्षा मंडळ दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘छप्पर फाडके’ गुणदान करत आहे.

हजारो विद्यार्थ्यांना शंभर टक्के तर मोजक्या नशिबवानांना त्यापेक्षा अधिक टक्के गुण कसे मिळतात? गुणांची ही खिरापत कोण बंद करणार? महाराष्ट्राची गुणवत्ता राजकारणात जास्त उठून दिसते.

तिला या गुणांचा आधार असावा का? देशानेच नव्हे तर जगाने तोंडात बोटे घालावीत एवढी ती गुणवत्ता उत्तुंग आहे. एकूणात, महाराष्ट्रदेशीच्या शिक्षणाचा ‘विनोदी’ खेळखंडोबा चालू आहे. पुढे आणखी कोणत्या दिव्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागेल ते देवालाच किंवा राज्य शिक्षण मंडळालाच माहीत!

LEAVE A REPLY

*