चॉपर हल्ल्यातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-शहरातील राजीवगांधी नगरमध्ये किरकोळ कारणावरून वाद होवून एका तरुणावर चॉपरने हल्ला करण्यात आल्याची घटना दि.12 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली होती.
या तरुणावर नाशिक येथे उपचार सुरु असतांना आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून उर्वरित तिघे अद्याप फरार आहे.
राहुल प्रल्हाद सकट वय 25 असे मयत तरुणाचे नाव आहे. राहुली हा घरबाहेर हातगाडीवर जेवण करीत असतांना सत्यासिंग बावरी याने त्याला विनाकारण डोक्यावर मारत दारुसाठी पैसे मागीतले.

यावरुन किरकोळ वाद होऊन राहुल घरात गेला. त्याच्या मागेच सत्यासिंग बावरी, त्याचा भाऊ करतारसिंग व मालाबाई, कालीबाई बावरी आदी चौघे राहुलच्या घरी आले.

राहुल याला घरातून बोलावून वाद घालत त्यांनी राहुलचा भाऊ अजय व आई म्हाळसाबाई यांना मारहाण करण्यास सुरवात केली. हाणामारीत सत्याने चॉपर राहुलच्या पोटात खुपसला.

जखमी राहुल याला तात्काळ जिल्हा रुग्णायलयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतू प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला दुसर्‍या दिवशी लागलीच नाशिक येथे खाजगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.

यानंतर त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतू आज सकाळी उपचार घेत असतांना राहूल सकट या तरूणाचा मृत्यू झाला.

यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. तर नाशिक येथे राहूलच्या मृतदेहावर शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी मृतदेह जळगावात आणण्यात आला.

मात्र, राहूलच्या मृत्यूमुळे राजीवगांधीनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणीही नातेवाईकांनी धरून ठेवली होती.

महिलेची कोठडीत रवानगी
राहूल याच्या भाऊ अजय सकट याच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आला होता.

त्यानंतर रात्रीतून निरीक्षक बी.जे.रोहम यांच्या पथकाने कालीबाई बावरी हिला अटक केली, उर्वरीत सत्यासींग, करतारसींग व मालीनबाई पळून गेले. अटकेतील कालीबाईला न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवस पोलिस कोठडीत सुनावली आहे.

 

LEAVE A REPLY

*