तामसवाडी धरणातील वाया जाणारे पाणी पिंपळकोठा इंदासी धरणात : आ चौधरींच्या मागणीवर जलसंपदा मंत्र्यांची शिफारस

0
अमळनेर : प्रतिनिधी :  तामसवाडी ता पारोळा या धरणातील वाया जाणारे पावसाचे पाणी इंदासी धरण पिंपळकोटा येथे साठवणुकीसाठी सोडण्याची मागणी आ शिरीष चौधरी यांनी जलसंपदा मंत्री ना गिरीश महाजन यांचेकडे केल्याने मंत्र्यांनी सकारात्मक शिफारस सचिवांकडे केली असून यामुळे परिसरातील २५ ते ३० दुष्काळग्रस्त गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे.
  यासंदर्भात आ शिरीष चौधरी यांनी ना गिरीष महाजन यांची १० जुलै रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन मागणि संदर्भात लेखी पत्र दिले होते. यात म्हटले होते की मी प्रतिनिधीत्व करीत असलेल्या अमळनेर विधान सभा क्षेत्रातील तामसवाडी धरण ता पारोळा या धरणातून दरवर्षी पावसाचे पाणी  मोठया प्रमाणात वाया जात असते.
सदर धरणावरून वाया जाणारे पाणी इंदासी धरण पिंपळकोटा या धरणा मध्ये सोडण्याबाबत उपाय योजना होणे गरजेचे आहे. तामसवाडी धरण व इंदासी धरणा लगत २५ ते ३० गावांमध्ये दरवर्षी दुष्काळ जन्य परिस्थितीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे तामसवाडी धरणातील वाया जाणारे पावसाचे पाणी इंदासी धरण पिंपळकोटा येथे साठवणुकीसाठी सोडावे.
जेणे करून २५ ते ३० गावांना दुष्काळ परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही.  तरी  वरील प्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून तात्काळ आदेशीत करावे. अशी  विनंती आ चौधरी यांनी यात करून चर्चा करताना अधिक खरी परिस्थिती लक्षांत आणून दिली.
यामुळे मंत्र्यांनी क्षणाचा विलंब न करता दिलेल्या पत्रावर तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश देऊन तशा प्रत्यक्ष सूचनाही सचिवांना दिल्या यामुळे आता तामसवाडीचे वाया जाणारे पाणी निश्चितपणे इंदासी धरणात जाईल व यामुळे परिसतील अनेक दुष्काळग्रस्त गावे जलयुक्त होतील अशी भावना आ चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
   दरम्यान सतत अवर्षणप्रवण असलेल्या अमळनेर मतदार संघात यावर्षीही वरुण राजाची अवकृपा होत असल्याने शेतकरी राजासह जनता संकटात आहे परंतु आपल्या जनतेला यातून बाहेर काढून दिलासा देण्यासाठी आ शिरीष चौधरी, डॉ रवींद्र चौधरी आणि त्यांचा हिरा उद्योग समूह प्रामाणिक प्रयत्न करताना दिसून येत आहे.
त्यांनी मतदार संघात केलेली जलयुक्त शिवारची कामे, नाला व नदी खोलीकरण, सिमेंट बंधारे, तसेच  पाडळसे धरणाचे सुरु झालेले काम, उपसा सिंचन योजनांना मिळालेली मंजुरी यासह सिंचनाची होत असलेली इतर कामे यामुळे सतत अवर्षण प्रवण मतदार संघास खरोखरच दिलासा मिळत असून यामुळे चौधरी बंधूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

*