‘माळीण’करांना हमी देणार का ?

0
तीन वर्षांपूर्वीच्या पावसाळ्यात डोंगर कोसळून पुणे जिल्ह्यातील अख्खे ‘माळीण’ गाव उद्ध्वस्त झालेे. त्या दुर्घटनेत दीडशे ग्रामस्थांना जिवंत समाधी मिळाली होती. आता या गावाचे पुनर्वसन झाले आहे.

सरकारी पुढाकाराने व काही सामाजिक संस्था आणि दानशुरांच्या सहकार्यातून ‘माळीण’ पुन्हा उभे केले गेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक मंत्र्यांच्या साक्षीने पुनर्वसित माळीण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा दोन महिन्यांपूर्वी पार पडला.

तथापि चालू वर्षीच्या पहिल्याच पावसाने माळीण गावातील सरकारी कामाच्या दर्जाचा पर्दाफाश केला आहे. नवे रस्ते खचले आहेत. शाळा व घरांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ पुन्हा भेदरले आहेत.

आताच्या परिस्थितीने त्यांच्या मनात २३ जुलै २०१४ च्या दुर्घटनेची कटू आठवण पुन्हा रुंजी घालू लागली आहे. काही अघटित घडण्याच्या भीतीने पुनर्वसित गावातील ग्रामस्थांच्या पोटात गोळा उठणे साहजिक आहे. म्हणूनच काही कुटुंबे तात्पुरत्या छपराखाली स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत.

जिल्हाधिकार्‍यांसह अन्य अधिकार्‍यांनी येथील कामांना वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. सर्व कामे उत्तम दर्जाची झाली असून त्रयस्थ यंत्रणेमार्फतही तपासणी करण्यात आली, असे सांगण्यात आले.

तसे दाखलेही संबंधित अभियंत्यांनी दिले आहेत. बांधकामांना कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला आहे. वास्तव चित्र मात्र धोक्याची घंटा वाजवत आहे.

‘असे काही घडणार नाही’ अशी लेखी हमी तसे सांगणारे अभियंते ग्रामस्थांना देतील का? तसे काही घडलेच तर त्याची संपूर्ण जबाबदारी दाखले देणार्‍या अभियंत्यांची असेल, असे लेखी स्वरुपात सांगण्याचा उमदेपणा संबंधित अधिकारी व अभियंत्यांकडून तरी दाखवला जाईल का?

माळीण प्रकल्प प्रशासनाने संवेदनशीलतेने हाताळल्याची शाबासकी मुख्यमंत्र्यांनी दिली खरी; पण याही प्रकल्पावर ‘सरकारी पद्धतीची’ काळी छाया पडली असावी. ही कामे देताना ठेकेदार, कंत्राटदार आणि शासन-प्रशासनातील नेहमीची मिलीभगत झाल्याशिवाय राहिली असेल का?

झालेल्या कामांना पडलेले तडे निर्धोक असल्याचे सांगितले जात असले तरी एकदा जीवन उद्ध्वस्त झालेल्यांना तेवढ्याने दिलासा कसा मिळणार? महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुलाबाबतसुद्धा सरकारी अभियंत्यांनी पुलाला धोका नसल्याचा निर्वाळा दिला होता.

तरीही गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात तो पूल कोसळून चाळीस प्रवाशांचा बळी गेलाच ना? ‘माळीण’ भुईसपाट होणे व सावित्री पूल खचणे या दोन्ही घटना जनतेच्या तोंडचे पाणी पळवणार्‍या असल्या तरी टक्केवारीला चटावलेल्यांना त्याचे काय होय?

LEAVE A REPLY

*