Blog : कर्करोगावर टोमॅटोचा उतारा ?

0

२१०० पर्यंत तापमानात ८ अंश सेल्सिअसची वाढ अपेक्षित असून त्वचेच्या आणि पोटाच्या कर्करोगात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. संशोधकांनी कर्करोगावर टोमॅटो अत्यंत गुणकारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रदूषण रोखले गेले नाही तर २१०० पर्यंत जागतिक तापमानात तब्बल ८ अंश सेल्सिअसची वाढ होईल, असा इशारा संशोधकांनी नुकताच दिला आहे. मुळात विकसित देशांनीच औद्योगिकरण आणि शहरीकरण म्हणजे प्रगती आणि विकास असे समीकरण मांडून गेली अनेक वर्षे नैसर्गिक स्रोतांची भरमसाठ नासधूस करून हे संकट जगासमोर वाढून ठेवले आहे.

आता तेच याला प्रतिबंधक उपाय योजण्यापासून दूर गेले तर या करंटेपणामुळे जगावर आणखी अरिष्ट ओढवल्याखेरीज राहणार नाही. या म्हणण्याला पुष्टी देणारे संशोधन नेचर क्लायमेट चेंज या जर्नलमध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. हे संशोधन कोणा एका देशाच्या संदर्भात करण्यात आलेले नाही ही यातील महत्त्वाची बाब आहे.

ङ्ग्रान्सिस्को इस्त्रादा ऑङ्ग द युव्हर्सिदाद नॅसिओनल ऑटोनॉमा डे मेक्सिको या संशोधन संस्थेच्या संशोधकांनी केलेल्या या संशोधनात १९५० ते २०१५ या कालखंडातील तापमानवाढीचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये एकूण १६९२ शहरांच्या तापमानाचा विचार करण्यात आला. या शहरांमध्ये टोकियो, न्यूयॉर्क, बीजिंग, लागोस, साओ पावलो, लंडन आणि मॉस्को यांचा समावेश आहे.

अभ्यासातील सर्व शहरांमध्ये एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून २०१५ पर्यंत सातत्याने तापमानवाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हरितगृह वायूंचे प्रचंड उत्सर्जन हे यामागचे कारण आहे, हे आणखी एकदा स्पष्ट झाले आहे. ही बाब अशीच सुरू राहिली तर २१०० पर्यंत तापमानवाढ किमान सात अंश सेल्सिअसने वाढेल, असा धोक्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.

त्यामुळे उन्हापासून होणारी काहिली थांबवण्यासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याची गरज निर्माण होणार आहे. साहजिकच याचा ताण नैसर्गिक स्रोतांवर येणार असून मानवी आरोग्याची नासाडी हा यातील सर्वाधिक चिंतेचा विषय आहे.

उष्ण कटिबंधाजवळची मोठी लोकसंख्या असलेली शहरे सरासरी जागतिक तापमानवाढीला कारणीभूत असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. वने, उद्याने, झरे आणि तळी यांसारखे वातावरण थंड करणारे स्रोत नागरीकरणामुळे नष्ट होत चालल्यामुळे तापमानवाढीत मोठी भर पडत चालल्याचे त्यांनी आणखी एकदा नोंदवले आहे. वनीकरण, वृक्षलागवड आणि संवर्धन यांची नितांत आवश्यकता आहे.

सध्या बहुतांश शहरांमध्ये ङ्गक्त एक टक्का पृष्ठभागावर हिरवाई दिसते, मात्र कोळसा, खनिज तेल यांचा इंधनापोटी वापर करून कार्बन डाय ऑक्साईडचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन केले जाते. जेमतेम एक टक्का हिरवाई वातावरणाचे प्रदूषण दूर करू शकत नाही. त्यामुळे कर्करोगासारखे आजार थैमान घालत आहेत.

तापमानवाढीमुळे जीन्समध्येही बदल घडून आनुवंशिक आजारांमध्ये वाढ होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. ओझोनचा थर विरळ झाल्यामुळे हानिकारक अतिनील किरण मोठ्या प्रमाणात पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तापमानवाढ अशीच सुरू राहिली तर विरळ झालेल्या थराला ठिकठिकाणी छिद्र पडतील आणि सजीवसृष्टीमध्ये हाहाकार माजेल.

त्यातून त्वचेच्या कर्करोगाप्रमाणेच आतड्याच्या कर्करोगाचे प्रमाण वाढेल, असे भाकित या संशोधकांनी केले आहे. या सगळ्या भयावह निष्कर्षांना थोडीशी दिलासादायक कडा प्राप्त झाली आहे ती आँकोलॉजी रिसर्च सेंटर ऑङ्ग मर्कऑग्लिऑनो येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनामुळे! या संशोधकांनी दाखवून दिले आहे की, कर्करोगावर टोमॅटोचा चांगला उपयोग होतो. त्यांनी वाढत्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी उपाययोजना शोधण्यासाठी संशोधन हाती घेतले होते.

त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पोटाच्या कर्करोगाच्या पेशींची अनैसर्गिक वाढ टोमॅटोंमुळे रोखता येते असे त्यांना आढळून आले आहे. या संशोधकांनी टोमॅटोचा रस काढून पोटाच्या कर्करोगाच्या पेशींवर त्याचा वापर केला. टोमॅटोतील लायकोपीनमुळे हे घडत असावे, असा त्यांचा अंदाज आहे.

परंतु टोमॅटोतील इतर द्रव्येही कर्करोग प्रतिबंधक असल्यामुळे टोमॅटो संपूर्ण सालीसकट खाणे हा कर्करोगाला आळा घालण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रयोगांसाठी संशोधकांनी टोमॅटोच्या सॅन मार्झानो आणि कॉर्बरिनो या प्रजातींचा वापर केला.

मात्र प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रजातींवर अशाप्रकारे संशोधन केले गेले तर ते अधिक उपयुक्त ठरेल, असे त्यांनी जाहीर केले आहे. संपूर्ण टोमॅटोच्या रसामुळे बाधित पेशींना कर्करोगग्रस्त शरीरात पसरण्यापासून रोखले जाते. रेटिनोब्लास्टोमा ङ्गॅमिलीतील प्रथिने आणि विशिष्ट पेशीसाखळी प्रतिरोधके यांच्यामुळे हे घडते, असे त्यांनी म्हटले असून कर्करोगग्रस्त पेशी अखेरीस मृत बनतात, असेही या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

पारंपरिक औषधोपचारांमध्ये भरपूर सामर्थ्य असल्याचे या संशोधकांनी मान्य केले असून जगभरातील अशा उपचारपद्धतींचा शोध घेतला जात आहे. विविध टप्प्यांमधील कर्करोगावर विविध प्रजातींचा वेगवेगळा उपयोग होण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रजातींचा सढळ वापर करण्यावर लोकांनी भर द्यावा, असे संशोधकांनी म्हटले आहे. त्वचेच्या कर्करोगावरही टोमॅटो उपयुक्त ठरत असल्याची काही संशोधने वेळोवेळी प्रसिद्ध झाली आहेत.

विविध अवयवांमधील ट्युमरची वाढ रोखण्यासाठीही टोमॅटो उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही तापमानवाढ, प्रदूषण यांना आळा घालण्याऐवजी केवळ टोमॅटो खाऊन तंदुरूस्त राहणे हा पर्याय योग्य ठरू शकत नाही, कारण तापमानवाढीचे इतरही अनेक दुष्परिणाम आहेत, असा इशारा देण्यासही संशोधक विसरलेले नाहीत. त्यामुळे राहणीमानात बदल करून निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाणे आणि तथाकथित आधुनिकीकरणावर नियंत्रण राखणे महत्त्वाचे आहे.

स्थानिक वनौषधींवर संशोधन आवश्यक

टोमॅटोमध्ये साखरेचे प्रमाण अत्यल्प, ९५ टक्के पाणी ४ टक्के, पिष्टमय पदार्थ, एक टक्क्याहून कमी प्रमाणात चरबी आणि प्रथिने असतात. १०० ग्रॅम कच्च्या टोमॅटोंमधून १८ उष्मांक प्राप्त होतो.

व्हिटॅमिन ‘क’चा हा चांगला स्रोत आहे. कर्करोगासाठी टोमॅटो उपयुक्त असल्याचे संशोधन सातत्याने समोर येत आहे. मात्र याविषयी आपल्याकडच्या प्रजातींवर प्रत्येक ठिकाणी संशोधन केले जाणे आवश्यक मानले जाते.

त्याचबरोबर भारतासारख्या विविध प्रकारच्या वनौैषधींनी समृद्ध असलेल्या देशांनी आपापल्या भागातील वनस्पतींवर अधिक जोमाने संशोधन करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे याहूनही अधिक उपयुक्त आणि खात्रीशीर नैसर्गिक उपाययोजना करणे शक्य होईल. मात्र काहीही असले तरी मूळ कारण नष्ट करणे ही यातील सर्वाधिक महत्त्वाची बाब आहे हे मात्र खरे.

– विलास कदम

LEAVE A REPLY

*