चाळीसगाव येथील अतिक्रमण हटविण्यासाठी मोर्चा

0
चाळीसगाव| प्रतिनिधी :  शहरातील हिरापूर रोड स्थित छत्रपती शिवाजी नगर परिसरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. अतिक्रमणामुळे नागरिकांना चालणे देखील मुश्कील होत असल्याने, अतिक्रमण हटविण्यासाठी रहिवाशीनीच थेट बुधवारी नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला.

अचानक मोर्चा आल्याने न.पा.कर्मचार्‍यांची चांगलीच धावपळ उडाली.  हिरापूर रोडवरील शिवाजी नगर परिसरातील सर्व्हे.क्र. ३१४ वरील ९ मीटर रस्त्यावर सुरुवातीलाच असलेल्या प्लॉट धारकांनी अतिक्रमण केलेले आहे, अतिक्रमणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला चालणे देखील अडचणीचे ठरत आहे.

अतिक्रमण काढण्यासंदर्भात नगर परिषदेला येथील रहिवाशांनी वेळोवेळी पत्रव्यवहार देखील केला आहे. परंतु याची दखल आजवर प्रशासनाकडून घेण्यात अली नाही. तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी अतिक्रमीत जागेचे मोजमाप करावयास आले असता पुर्ण मोजमाप न करता सारवासारव करुन निघून गेले होते.

यामुळेच परिसरातील नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होऊन दि.२१ रोजी नगरपरिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात अतिक्रमण संदर्भात ठोस पाऊस न उचलले गेल्यास परिसरातील नागरिक नगरपरिषदेचा कुठलाही कर भरणार नाही, असा धमकीवजा इशारा देखील संतप्त नागरिकांच्या वतीने देण्यात आला. तसेच तीव्र स्वरुपात आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देण्यात आला.

यावेळी नगरसेविका अलका गवळी, अनिल जाधव, सदाशिव गवळी, संजय पाटील, अविनाश वाबळे, वामनराव देशमुख,दुर्गेश जाधव,मधुकर पाटील, अशोक देशमुख, अविनाश साठे, दगा शिंदे, पंकज दाभाडे, चेतना शेलार, कमल जाधव, संजीवनी जाधव, रंजना पाटील, कुदाबाई जाधव, संजय पाटील, अरुण देशमुख, सचिन दाभाडे, बाळू कुमावत, राजेंद्र लगडे, शरद शेलार आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*