फितुरांच्या साथीने मुख्यमंत्र्यांकडून संपात फुट पाडण्याचे पाप

0
जळगाव / किसान क्रांती कृती समितीच्या फितुरांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संपात फुट पाडण्याचे पाप केले आहे.
त्यांचा सर्व शेतकर्‍यांकडून कृती समितीचे समन्वयक एस.बी. पाटील यांनी निषेध केला. मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकर्‍यांचा संप सुरुच राहणार असून सोमवारी महाराष्ट्र बंद करणार असल्याची माहीती देखिल त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जळगावच्या कृषक भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत एस. बी.पाटील यांच्यासह समितीचे सदस्य प्रा. डी. डी. बच्छाव, डॉ. राधेश्याम चौधरी, जगतराव पाटील, संजीव बाविस्कर, विवेक रणदिवे, जयंत देशमुख, कडूअप्पा पाटील उपस्थित होते.

यावेळी एस. बी. पाटील यांनी पुढे सांगीतले की, शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी लढा देण्यासाठी राज्यातील 13 जणांची कृती समिती नेमण्यात आली होती.

यात अनेक राजकीय लोक देखिल शेतकर्‍यांच्या भूमिकेतून सहभागी झाले होते. मात्र, काल रात्री मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समितीमधील जयराज सुर्यवंशी, धनंजय जाधव व संदिप गीड्डे यांनी इतर सदस्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्री यांच्या प्रलोभनांना बळी पडून संप मागे घेतल्याचे जाहीर केले.

मात्र हा निर्णय त्यांनी त्यांच्या पातळीवर घेतला असून राज्यासह जळगाव जिल्ह्यात सरसकट कर्जमाफीसह मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच राहील असे त्यांनी सांगीतले.

मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना तोंडाला पाने पुसली
मुख्यमंत्री यांनी शेतकर्‍यांची एकही मागणी मान्य न करता त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. जनता सुखी राहू नये असे वाटणारे हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचा आरोप एस.बी. पाटील यांनी केला. व्यापार्‍यांचे राजकारण करणारे मुख्यमंत्री आहेत त्यांना समितीच्या फितुरांना हे पाप भरावेच लागेल असाही संताप पाटील यांनी व्यक्त केला.

संघर्षात जिंकलो तहात हरलो
संपा सहभागी सदस्यांमध्ये राजकारण करुन फुट पाडण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले. संप मागे घेतल्याचे जाहीर केल्याने शेतकर्‍यांमध्ये सभ्रम निर्माण झाला. आम्ही त्यांच्या या रणनितीत हरलो असलो तरी संघर्ष चालुच राहणार असल्याचे एस.बी.पाटील यांनी सांगितले.

शेतकर्‍यांचा लढा आणखी तिव्र
शेतकर्‍यांचा संप अद्याप सुरुच राहणार आहे. शेतकर्‍यांनी माघार घेवू नये, थोडे दिवस कड काढा संपूर्ण मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरु ठेवा असे आवाहन पाटील यांनी शेतकर्‍यांना केले. तसेच दि.5 रोजी पुकारलेले महाराष्ट्र बंद आंदोलन देखिल सुरुच राहील असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

LEAVE A REPLY

*