अस्वस्थ लोकांकडून शेतकर्‍यांच्या बदनामीचा प्रयत्न

0
जळगाव / राज्यातील सरकार हे शेतकरी हिताचे आहे. त्यामुळे काही लोक अस्वस्थ झाले आहेत. या लोकांनी शेतकर्‍यांना पुढे करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा हल्लाबोल राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर ‘देशदूत’शी बोलतांना केला.
कालपासुन शेतकर्‍यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपादरम्यान राज्यभरात शेतकर्‍याच्या संतापाचा उद्रेक बघायला मिळाला.

संपाबाबत महसुलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांचे हे प्रश्न काही गेल्या अडीच वर्षात निर्माण झाले नाही. 15 वर्षापासुन शेतकर्‍यांचे प्रश्न प्रलंबीत आहे.

शेतकर्‍याला कर्जमाफी करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. परंतु नुसतंच कर्जमाफी करून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकर्‍याचे उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे.

त्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतुदही करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातुन राज्यातील 11000 गावांमध्ये पाण्याचा साठा वाढविण्यात यश आले आहे.

तसेच मागेल त्याला शेततळे, कृषी सिंचाई योजना, माती परीक्षण, हवामाना आधारीत योजना यामाध्यमातुन शेतकर्‍याचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

कर्जमाफी करून शेतकर्‍याला कर्जबाजारी करणे योग्य होणार नाही. त्याला आधी सक्षम करणे आवश्यक आहे. राज्यातील काही लोक अस्वस्थ झाले आहेत.

ते शेतकर्‍यांना पुढे करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*