बारामतीत वाहिले दुधाचे पाट!

0
बारामती  / 1 जूनपासून पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी शेतकरी संपाची धग दुसर्‍या दिवशीही बारामतीत कायम राहीली. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी भाजी मंडई, दुधाचे टेम्पो यांना लक्ष्य केले.
आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दूध विक्रीवर नियंत्रण आणले. रस्त्यात पकडलेले दूध ओतून देण्यात आले. यामुळे इंदापूर- बारामती रस्त्यावर दुधाचे पाट दिसत होते.
शेतकर्‍यांनी आजपासून कोणीही दुधाची वाहतूक करू नये, दूध घरच्या लोकांना द्यावे, एकदा तरी घरच्यांना पेढे, खवा खाऊ द्या असे आवाहन यावेळी शेतकर्‍यांनी करतानाच यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही, जर घरी न ठेवता दूध बाहेर पुरवठा करण्याची खुमखुमी ठेवली तर उद्यापासून दुधाचे कॅनही रस्त्यावर फोडू असा इशारा दिला.
आज सकाळी पहाटे काटेवाडी येथे शेतकर्‍यांनी पहिल्यांदा आंदोलन केले. येथे दुधाचे टँकर व टेम्पो अडवून शेतकर्‍यांनी दूध रस्त्यावर ओतून दिले.
त्यानंतर शेतकर्‍यांनी पिंपळी येथील खासगी दूध प्रक्रिया प्रकल्पावर धडक दिली. येथे कोणत्याही परिस्थितीत आजपासून दूध स्वीकारले जाणार नाही. तसेच येथून दूध पाठविले जाणार नाही असे आश्वासन प्रकल्पप्रमुखांनी दिल्यानंतर शेतकर्‍यांनी रस्त्यावरून ये-जा करणारे दुधाचे टेम्पो लक्ष्य केले.
पिंपळी येथे दुधाचे टेम्पो अडवून पुन्हा संप मिटेपर्यंत दूध रस्त्यावर आणू नका, असे आवाहन करीत टेम्पोमधील दूध ओतून दिले.
दुसरीकडे आज सकाळीच गुनवडी चौकातील भाजी मंडईत जाऊन आंदोलकांनी भाजी मंडईत आज कोणी भाजीविक्री करणार नाही याची खातरजमा केली.
दरम्यान कोणीही भाजीमंडईचे स्टॉल उघडणार नाही व विक्री करणार नाही असे भाजीविक्रेत्यांनी स्पष्ट केल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा नंदन दूध डेअरीकडे वळविला.
बारामती दूध उत्पादक संघाच्या या प्रकल्पात आज दूध घेतले जात होते, ही माहिती मिळाल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. तेथेही त्यांनी रस्त्यावर टेम्पोमधील दूध ओतून दिले. रतिबासाठी दूध घेऊन जाणारेही आंदोलकांचे लक्ष्य बनले.

LEAVE A REPLY

*