शेतकर्‍यांच्या संपाचा मुंबई बाजार समितीवर परिणाम नाही !

0
ठाणे / राज्यभरातील शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपाचा आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोणताच परिणाम जाणवला नाही. त्यामुळे भाजीपाला फळे, कांदा-बटाटा सारख्या कृषी मालाची आज नियमित आवक बाजार समितीमध्ये झाली.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्राबरोबरच परराज्यातूनही भाजीपाल्याची आवक होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांपेक्षा अधिक माल हा व्यापारी आणि दलालांचा येतो.
यामुळे येथे महाराष्ट्रातून साठ टक्के तर परराज्यातून चाळीस टक्के माल येतो. राज्यातील संपाचा लगेच येथे परिणाम जाणवणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे आज पहिल्या दिवशी तीनही बाजारात कृषी मालाची आवक नियमित आहे.

मुंबई आणि उपनगरांना भाजीपाल्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी साडेपाचशे गाड्या भाज्यांची आवक हवी असते. आज नियमित आवक आहे.

व्यापार्‍यांनी नियमित मालाची खरेदी केली. त्यामुळे मालाची आवक ही नियमित झाली आहे. यामुळे आज या संपाचा भाजीपाला बाजारावर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती भाजीपाला बाजाराचे माजी संचालक शंकर पिंगळे यांनी दिली.

तर तीनही बाजारात मालाची नियमित आवक झाली असून सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शिवाजी पाहिंकर यांनी दिली.

आज भाजीपाल्याची आवक नियमित झाली असली तरी उद्या मात्र मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.

मात्र शेतकर्‍याचा संप असल्याने किरकोळ व्यापार्‍यांनी मालाची आज मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळाले.

त्यामुळे घावूक बाजारात आज मालाचे भाव दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले होते, तर किरकोळ बाजारात मात्र भाज्यांचे भाव पंचवीस ते तीस टक्क्यांनी अधिक वाढले होते.

LEAVE A REPLY

*