पोलिस आयुक्त वेळेवर आले नाही म्हणून आमदार गेले निघून

0
औरंगाबाद / लोकप्रतिनिधींच्या विलंबाचे अनेक किस्से समोर येतात. पण वेळेवर आलेल्या आमदार, महापौरांना चक्क तासभर वाट पहावी लागल्याचा प्रकार शहर पोलिसांच्या कार्यक्रमात घडला.
पोलिस ठाण्याच्या नविन इमारतीच्या उद्धघाटनासाठी लोकप्रतिनिधींना बोलावले. ते वेळेवरही आले पण स्वत: पोलिस आयुक्तच नियोजित वेळेपेक्षा तासभर उशीरा आल्याने कार्यक्रमाचा बेरंग झाला, तत्पूर्वी त्रस्त एमआयएम व शिवसेनेचे आमदारांना पोलिस ठाण्याचे उद्घाटनाविनाच काढता पाय घ्यावा लागला.
पोलिस आयुक्तांची वाट पाहून दोन्ही आमदार निघून गेल्यानंतर व्यासपीठावर महापौर भगवान घडामोडे व माजी खासदार प्रदीप जैस्वाल हे उपस्थित होते. साडेचार वाजेच्या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त यशस्वी यादव तासाभराने हजर झाले.
त्यामूळे महापौरांना ताटकळत बसावे लागले. यानंतर पोलिस ठाण्याची फित कापण्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला. बेगमपुरा पोलिस ठाण्याचे बीबीका-मकबरा परिसरातील नविन जागेत स्थलांतर करण्यात आले आहे.
रंगरंगोटी व सजावट झाल्यानंतर बूधवारी सायंकाळी साडेचार वाजता उद्घाटन होते.

या कार्यक्रमाला एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट, शहराचे महापौर भगवान घडामोडे तसेच माजी खासदार प्रदीप जैस्वाल आदींना बोलावण्यात आले होते.

उद्घाटन कार्यक्रम सायंकाळी साडेचारला असल्याने वेळेवर पोचण्यासाठी इम्तियाज जलील यांनी संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना फोनवरून विचारणा केली.

त्यावेळी पोलिस आयुक्त येत आहेत. आपणही त्वरीत या असा निरोप त्या अधिकार्‍यांनी दिला. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच इम्तियाज जलील कार्यक्रमस्थळी पोहचले.

आमदार संजय सिरसाट व महापौर देखील वेळेआधीच स्थानापन्न झाले होते. साडेचारची वेळ असतांना घड्याळात पाच वाजून वीस मिनिटे झाली, तरी पोलिस आयुक्त कार्यक्रमस्थळी आले नव्हते.

विचारणा केल्यावर साहेब येतच आहे असा निरोप अधिकारी देत होते. महत्वाची कामे सोडून आलेल्या आमदार इम्तियाज जलील यांनी व्यासपीठ सोडण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ संजय सिरसाट यांनीही काढता पाय घेतला.

LEAVE A REPLY

*