पवारांच्या मनात निवृत्तीचे वारे !

0
जळगाव | प्रतिनिधी :  जुलैमध्ये होणार्‍या राष्ट्रपती निवडणुकीसाठी एकीकडे विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नावाचे लॉबिंग होत असतांनाच खुद्द पवारांनीच निवृत्तीचा राग आळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मात्र, पवार बोलतात त्याच्या नेमकं विरुध्द करतात हा अनुभव असल्याने पवारांच्या मनात चाललंय काय याचा शोध घेण्यात अनेक जण गुंग झाले आहेत.

विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अमृत महोत्सवासाठी खा. शरद पवारांसह अनेक दीग्गजांनी चोपड्यात हजेरी लावली. सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर असुनही राजकारणाचा गंध या सोहळ्याला नव्हता, हे विशेष.

सर्वच वक्त्यांनी अरुणभाईंच्या कार्यकर्तृत्वाचे मनापासून कौतुक केले. खा. पवारांनीही आपल्या ज्येष्ठ सहकार्‍याच्या कौतुकात कोणतीही कंजुषी केली नाही.

नोटबंदीनंतर तयार झालेले वातावरण, अडचणीत आलेले सहकार क्षेत्र, शेतकर्‍याच्या मालाला मिळत नसलेल्या भावावरुन सत्ताधार्‍यांवर बोचरी टिका करुन झाल्यावर पवार म्हणाले, अरुणभाई, तुम्ही आता पंचाहत्तरीत आलात, मी आणि सुशिलकुमार शिंदेही पंचात्तरचे झालो आहोत. त्यामुळे आता अधिक काय बोलायचे आपण?

आता आपण हळुहळु नव्या पिढी कडे सर्व वर्ग केले पाहिजे. सल्ला मागेल त्यावेळी सल्ला दिला पाहिजे, उगीच नको त्या ठिकाणी हस्तक्षेप करण्याची भूमिका घेता कामा नये. आयुष्यभर चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपण जे प्रयत्न केले त्यातून जे समाधान मिळाले त्यात आनंद मानायला पाहिजे.

पवारांच्या या वक्तव्यातून त्यांच्या मनात कुठेतरी निवृत्तीचे वारे घोंगावत असल्याचे संकेत मिळाले. एकीकडे विरोधी पक्षाकडून त्यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी घेतले जात असतांना त्यांच्या मनात निवृत्तीचे विचार का यावेत असा प्रश्‍न उपस्थितांमध्ये निर्माण झाला.

तर शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट अर्थ घ्यायचा असतो अशी टिपण्णी काही ज्येष्ठ जाणकारांनी केली. पवारांच्या मनात नेमकं काय आहे हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होणार आहेच.

LEAVE A REPLY

*