मोदी, ठाकरे, खडसे, अण्णा हजारे यांच्या घातपाताचे इसीसचे धमकीपत्र : राज्यात हायअलर्ट

0

जळगाव |  प्रतिनिधी :  राज्यात बॉम्बस्फोट घडवुन मोठा घातपात करण्यात येणार असल्याचा उल्लेख असलेले इसीस या दहशतवादी संघटनेचे धमकीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला दि.२९ रोजी प्राप्त झाले.

या पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह राजकिय नेते व धार्मिक स्थळे उडविण्याची धमकी इसीसने दिली आहे. या पत्रामुळे जिल्हासह राज्यात खळबळ उडाली आहे.

इसीसचा उल्लेख असलेले पत्र जिल्हाधिकारी कार्यालया प्राप्त झाले. हे पत्र टपाल विभागात आज सकाळी संबधीत कर्मचार्‍यांना आढळले. इसीसच्या पत्रामुळे गोपनीय यंत्रणेसह सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेल्या धमकी पत्रानुसार सतर्कता म्हणुन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक, जिल्हा पोलीस अधिक्षक जळगाव यांच्यासह यंत्रणेला अलर्ट करण्यात आले आहे.

बॉम्बस्फोट घडविण्याचा उल्लेख

इसीसचा उल्लेख असलेल्या पत्राव्दारे बॉम्बस्फोट घडविण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, विश्‍व हिंदु परिषदेचे प्रविण तोगडीया, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, राष्ट्रपती भवन, देवस्थान, शेगाव मंदीर, न्यायालय, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याचा उल्लेख इसीस संघटनेच्या नावाचा उल्लेखाचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले.

वर्षभरापुर्वीही आले होते इसीसचे धमकीपत्र

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला वर्षाभरापुर्वी इसीसचा उल्लेख असलेले धमकी पत्र आले होते.त्यामूळे जळगावासह राज्यात खळबळ उडाली होती.

बॉम्बशोधक पथकाव्दारे तपासणी

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेल्या धमकीपत्राच्या आधारे विमानतळावर तसेच गर्दी ठिकाणी बॉम्बशोधक पथकाव्दारे तपासणी करण्यात आली.

दरम्यान चोपडा येथे मंत्र्यांचा फौजफाटा असल्याने या नेत्यांचे वाहने जात असलेल्या मार्गाची देखील तपासणी करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*