कर्जमुक्तीसाठी ११ लाख अर्ज शेतकर्‍यांकडून भरुन घेणार : शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत निर्णय

0

जळगाव | प्रतिनिधी : शेतकर्‍याच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेतर्फे भगवा सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील ११ लाख शेतकर्‍यांकडुन अर्ज भरून घेतले जाणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली.

शिवसेनेतर्फे दि. ३० मे ते ५ एप्रिल या कालावधीत भगवा सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहाच्या नियोजनासंदर्भात आज पद्मालय विश्रामगृहात शिवसेनेची जिल्हा बैठक सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

याप्रसंगी शिवसेनेचे माजी आ. आर.ओ. पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, आ. किशोर पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, महिला आघाडीच्या महानंदा पाटील, ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, रावसाहेब पाटील, पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परीषदेत ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, दि. ३० मे ५ जुन या कालावधीत भगवा सप्ताह साजरा केला जाणार आहे. या सप्ताहात शेतकर्‍यांकडुन कर्जमुक्तीसंदर्भात अर्ज भरून घेतले जाणार आहे. जिल्ह्यातुन ११ लाख शेतकर्‍यांचे अर्ज भरून घेऊन ते अर्ज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले जाणार आहे.

या अर्जात शेतकर्‍याचे नाव, त्याच्यावर असलेले कर्ज, पिक, क्षेत्र, यासह १२ प्रश्‍न होय/नाही स्वरूपात भरून घेतले जातील. या सप्ताहाचा समारोप दि. ५ जुन रोजी पाळधी येथे होणार असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

असे आहेत १२ प्रश्‍न

* शेतकरी म्हणुन आपण सुखी आहात का?
* शेतीशिवाय आपले उत्पन्नाचे दुसरे काही साधन आहे का?
* पीक विमा योजनेचा तुम्हाला लाभ झाला आहे का?
* शेती करण्यासाठी तुमच्यावर कर्जाचा भार आहे का?
* कर्ज वसुलीच्या दबावामुळे मनात आत्महत्येचा विचार येतो का?
* पंतप्रधानांनी केलेल्या नोटबंदीचा तुम्हाला फायदा झाला का?
* सरकारकडे मागितलेले ‘शेततळे’ मिळाले का?
* ‘मागेल त्याला कर्ज’ या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा लाभ झाला का?
* लोडशेडिंगचा त्रास सुरू आहे का?
* गेल्या तीन वर्षात शेतमालास हमीभाव मिळाला का?
* सरकार निरूपयोगी ठरल्याची चीड मनात खदखदत आहे का?
* पीक विमा योजनेचा हप्ता कोण भरतं?.

असे १२ प्रश्‍न शेतकर्‍यांकडुन होय/नाही स्वरूपात भरून घेतले जाणार आहे.

LEAVE A REPLY

*