भुजबळ कुटुंबियांच्या संपत्तीवर पुन्हा टाच 20 कोटींची मालमत्ता जप्त

0

मुंबई । आर्थिक गैरव्यहारांप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छगन भुजबळ यांची 20 कोटींची मालमत्ता जप्त केली. आता भुजबळांच्या जप्त केलेल्या संपत्तीचा आकडा 178 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी छगन भुजबळ यांची 20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याच्या वृत्ताला ईडीमधील अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर या आठवड्यात न्यायालय निर्णय देणार आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) कलम 45 मुळे राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर गदा येते, असे भुजबळ यांच्या वकिलांनी सांगितले होते.

छगन भुजबळांच्या वतीने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालांचा दाखलाही देण्यात आला होता. त्यामुळे भुजबळ यांना जामीन मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र दुसरीकडे ही कारवाई झाल्याने भुजबळ कुटुंबियांना हादरा बसला आहे.

LEAVE A REPLY

*