मेडीसीन डिलर्स असोसिएशनच्या बैठकीत आरोप – प्रत्यारोप : भाजपा केमिस्ट महासंघाचे केमिस्ट भवन समोर आंदोलन; आ.जगन्नाथ शिंदेंनी घेतली भेट

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्हा मेडीसीन डिलर्स असोसिएशनच्या बैठकीत संघटनेबाबत कुरघोडया करणार्‍या सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्यात यावे या विषयावरून सत्ताधारी विरोधकांनी एकमेकांवर चांगलेच आरोप प्रत्यारोप केले.

तसेच बैठकीत बोलू दिल्या जात नसल्याचाही आरोप अध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्यावर करण्यात आला.दरम्यान केमिस्ट बांधवाच्या प्रलंबित मागण्यासाठी भाजपा केमिस्ट महासंघाच्यावतीने बैठकीठिकाणी आंदोलन करण्यात आले.

जिल्हा मेडीसीन डिलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा सुनिल भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सचिव अनिल झंवर, कोषाध्यक्ष महेंद्र महाजन, सहसचिव धनंजय तळेले, उपाध्यक्ष शामकांत वाणी, प्रदिप देशमुख, कार्यकारी सदस्य श्रीकांत पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

बैठकीत ११ विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी संजय नारखेडे, दिपक जोशी यांनी काही विषयांवर हरकत घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत बोलू दिले जात नसल्याचा आरोप अध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्यावर केला.

नाशिक येथील झोअरी नामक एका व्यक्तीने दिल्लीच्या न्यायालयात कर वाचविण्यार्‍या मेडिकल व्यवसायिकाविरुध्द तक्रार केली असून यात १४ जणांचा समावेश आहे.

त्यात शाकीर चित्तवाला व कनकमल राका यांचा समावेश आहे. या तक्रारीसंबंधीसाठी न्यायालयीन कामकाजासाठी जो खर्च लागत आहे त्या खर्चाला मंजुरी देण्यात यावी असा विषय बैठकीत मांडण्यात आला.

यावेळी दिपक जोशी यांनी हा खाण्याचा प्रकार असल्याचा आरोप सत्ताधारी गटावर केला. यावेळी सत्ताधारी गटाचे सदस्यांनी संघटनेविषयी कुरघोडी करणार्‍या सदस्यांचे सदस्य पद रद्द करण्यात यावी अशी मागणी करून प्रोसेडिंगला नोंद घ्यावी असे सांगितले. यावर देखील दिपक जोशी यांनी हरकत घेतली.

उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या महिलांना बेस्ट फार्मसी ऍवॉर्ड

जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते धनश्री मेडीकलच्या जयश्री सरोदे, चेतना मेडीकलच्या मीना पवार, मंगलमुर्ती मेडीकलच्या पुष्पा चौधरी, शुभम मेडीकलच्या अर्चना पाटील, आयुषी मेडीकलच्या वर्षा महाजन, नमन मेडीकलच्या रिंकु धाडीवाल, महालक्ष्मी मेडीकलच्या निलीमा बोरोले या महिलांना बेस्ट महिला फार्मसी ऍवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

आ. जगन्नाथ शिंदे यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट

केमिस्ट बांधवांच्या प्रलंबित मागण्यासाठी बैठकीवेळी केमिस्ट हॉलसमोर भाजपा केमिस्ट महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी उपोषण केले. एमएससीडीएचे अध्यक्ष आ.जगन्नाथ शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

केमिस्ट बांधवांनी कंपनीसाठी जमा केलेले पैसे प्रत्येकाला परत दिले जातील. आतापर्यंत ४० लाख रुपये परत दिले असून भाजपा केमिस्ट महासंघाने यात दलाली करू नये असे सांगून आंदोलन मागे घेण्यास सांगितले. तसेच केमिस्ट महासंघाच्या मागण्याबाबतचे म्हणणे निवेदनात मांडा असेही ते म्हणाले.

यावेळी मेडीकल डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांकडून बैठकीत बोलू दिले जात नसल्याचा आरोप यावेळी भाजपाच्या केमिस्ट महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी केला. यावेळी किशोर भंडारी, नगरसेवक सुनिल माळी, निशीकांत मंडोरा, संजय वानखेडे, शाकीर चित्तालवाला, कनकमल राका, राहुल वाघ, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.

कुरघोड्या करणार्‍याचे सदस्यपद रद्द करा

संघटनेविषयी कुरघोड्या करणार्‍या सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्यात यावे या विषयावरून बैठकीत किरकोळ गोंधळ झाला. यावेळी सत्ताधारी-विरोधकांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले. दिपक जोशी व संजय नारखेडे यांनी याबाबत हरकत नोंदविली.

मंडप उभारण्यावरून झाला वाद

भाजपाच्या केमिस्ट महासंघाने केमिस्ट भवन समोर आंदोलन करण्यासाठी दि.२२ रोजी रात्री ८ वाजता मंडप उभारला होता. यावेळी सुनिल भंगाळे यांनी मंडप उभारण्यास विरोध केल्याने वाद झाला असल्याचे समजते. दरम्यान आंदोलनासाठीचा मंडप चोरीला गेला असल्याचा आरोप भाजपा केमिस्ट महासंघाने केला आहे.

ऑडीटची धर्मदाय आयुक्ताकडे नोंद नाही

जिल्हा मेडीसीन डिलर्स असोसिएशनच्या ऑडीटची धर्मदाय आयुक्त कार्यलयाकडे २००३ पासूनची नोंद नसून दरवर्षीच्या ऑडीट खर्चाला मंजुरी कशी आरोप सदस्य दिपक जोशी यांनी बैठकीवेळी सुनिल भंगाळे यांच्यावर केला आहे.

१९ महिन्यानांतर बैठक

जिल्हा मेडीसीन डिलर्स असोसिएशनची दरवर्षी बैठक घेणे बंधनकारक आहे. मागील वर्षी दि.२१ सप्टेंबर रोजी २०१५ ला बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर १९ महिन्यानंतर आज बैठक घेण्यात आली. दरम्यान २२०० पैकी केवळ ४०० सदस्य बैठकीला उपस्थित होते.

विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही

संघटनेच्या विरोधकांनी सर्वसाधारण सभेवेळी पदाधिकारी व संघटनेवर केलेले आरोप हे तथ्यहीन आहे. विरोधकांनी आरोप सिध्द करून दाखवावे असे खुले आवाहन मेडीसीन डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी विरोधकांना केले आहे.

LEAVE A REPLY

*