नरभक्षक बिबट्याचा सहावा बळी

0

चाळीसगाव । दि.28 । प्रतिनिधी-तालुक्यातील वरखेडे परिसरात नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या पाहणीसाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन येथे आले होते.

त्यांनी बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश असल्याची माहिती दिली व यापुढे एकही मानवी जीव जाणार नाही अशा पद्धतीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात येईल असे सांगीतले होते.

परंतू मंत्री मोहदय पाहणी करुन माघारी फिरत नाही, तोच 24 तासांच्या आता पुन्हा बिबट्याने यमुनाबाई दला निरमली (65) यांच्यावर हल्ला करुन ठार करत, सहावा मानवी जीव घेतल्या आहे. ही घटना दि.28 रोजी मध्यरात्री दि.2.30 वाजेच्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून वनविभागावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

वरखेडे परिसरात नरभक्षक बिबट्याचा कहर सुरुच असून पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात सहावा मानवी बळी गेला आहे. नरभक्षक बिबट्याने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास वृध्द महिला यमुनाबाई दला तिरमली रा.वरखेडे खुर्दे यांच्यावर हल्ला करुन ठार केले आहे.

विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच सुशाबाई भिल्ल यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेला प्राण गमवावा लागला आहे.

मंगळवारी यमुनाबाई तिरमली व त्यांचा मुलगा अशोक तिरमली व सुन कमलबाई तिरमली हे त्यांच्या शेतातील झोपडीत झोपलेले होेते. रात्री 2.30 वाजेच्या सुमारास यमुनाबाई तिरमली यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला व त्यांना फरफटत 20 फूट लांब अंतरावर घेऊन गेला.

बिबट्याच्या हल्ल्यामुळे झोपडीच्या बाहेर बांधलेल्या गायीने दोर तोडुन पलायन केले. गायीचा आवाज ऐकूण यमुनाबाई यांचा मुलगा, सुनबाई व त्यांच्या बाजुलाच राहत असलेले संतोष तिरमली हे जागे झालेत, आणि सर्व जण घराच्या बाहेर आले.

तोपर्यंत बिबट्याने यमुनाबाई यांच्या मानीचे लचके तोेडत असल्याचे सर्वांनी पाहीले. समोर माणसे बघून पुन्हा बिबट्या मयत यमुनाबाई यांची मान जागेवर सोडून, त्यांचे धड जवळपास 400 फूट लांब अंतरावर घेऊन गेला.

मुलगा अशोक व संतोष यांनी बिबट्याची माहिती लगेच सरपंच व वनविभागाच्या कर्मचार्‍यांना दिली. घटनास्थळी लगेच 30 मिनिटात वनविभागाचेे कर्मचारी व ग्रामस्थ पोहचले, त्यांनी बिबट्याचा कसून शोध घेतला, परंतू त्यांना बिबट्या मिळून आला नाही. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

400 ते 500 फूट ओढत नेले
शेतातील झोपडीत झोपलेल्या यमुनाबाई तिरमली यांच्यावर मध्यरात्री नरभक्षक बिबट्याने हल्ला करुन, फरफटत झोपडीच्या बाहेर जवळपास 200 फुट अतंरापर्यंत नेले.

त्यानतंर बिबट्याने पुन्हा झोपडीबाहेर बांधलेल्या गायीची शिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतू गायीने बिबट्याचा प्रतिकार केला आणि दोर तोडून पलायन केले.

गायीचा आवाज ऐकूण झोपडीत झोपलेला यमुनाबाई यांचा मुलगा अशोक आणि जवळच्या घरातील त्यांचा पुतण्या संतोष हे जागे झाले. तोपर्यंत बिबट्या यमुनाबाई यांच्या मानीचे लचकेे तोडत होता.

अशोक, संतोष व इतर मंडळीला पाहुन, तो त्यांच्यावर गुरगुरला आणि तेथून पलायन केले. संतोष व इतर मंडळी सरपंच, ग्रामस्थांना फोन लावत असतानाच, पुन्हा 10 मिनिटांनी त्याठिकाणी बिबट्या आला आणि त्याने यमुनाबाई यांचे मृतशरीर अशोक व संतोष यांच्या डोळ्यासामोर ओढत नेले.

बिबट्याने नंतर यमुनाबाई यांच्या मानेचे लचके तोडल्यामुळे त्यांचे डोके धडावेगळे झाले. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी पोहचल्यानंतर त्यांना झोपडीपासून 20 फुटाच्या अंतरावर शिर तर धड त्यापासून 400 फुटांच्या अतंराव जवळपास दोन तासांच्या शोध मोहिमेनतंर मिळाले.

सोमवारी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे वरखेडे येथे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मयतांच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी आले होते.

बिबट्याला मारण्यासाठी त्यांनी स्वतः हातात पिस्तूल घेऊन शोधमोहिम राबविली, मात्र 24 तासांच्या आत बिबट्याने पुन्हा यमुनाबाई तिरमली यांच्यावर हल्ला करुन ठार केल्यामुळे प्रशासनावर चौफेर टिका होत आहे.

यमुनाबाई यांच्यावर बिबट्याने हल्ला केला नसून त्यांची हत्या करण्यात आल्याची अफवा दिवसभर पसरल्या होत्या. यामागचे कारणही तसेच होते कारण आतापर्यंत बिबट्याने हल्ल्यात ठार झालेल्या पाचही जणांचे धडापासून शिर वेगळे झालेले नव्हते.

त्यामुळे यमुनाबाई यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतू याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे श्वविच्छेदन करणारे डॉ. बी. पी. बाविस्कर यांच्याकडून माहिती घेतली असता, यमुनाबाई यांच्या शरीरावर बिबट्याचे केस आढळून आल्याचे त्यांनी सांगीतलेे. त्यामुळे खून झाल्याची अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वनविभागाकडून बिबट्याचा कसून शोध
नरभक्षक बिबट्याचा वनविभाग आधिकारी व कर्मचारी कसून शोध घेत आहेत. एकपेक्षा जास्त बिबट्या असल्याची शक्यता असल्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी जवळपास 200 कर्मचारी तैनात करण्याता आले आहेत.

यात वनविभागाचे 150 कर्मचारी व पोलीस व एसआरपीचे 50 कर्मचारी आहेत. बिबट्याला दिसताच क्षणी गोळी घालण्यासाठी 25 शार्पशूटर्सची नेमणूक करण्यात आली आहे.

यात 10 शार्पशूटर्स पोलीस विभागाचे व 15 शार्पशूटर्स हे वनविभागाचे आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून 10-10 कर्मचार्‍यांची टिम तयार करण्यात आल्या आहेत.

यात पळसमळी, खडक्यादरी , दपणदरा, मालपुरा, मांजरी, चौकीबर्डी, दरेगावनाला, धरणखोसा, घुबड्या, सुतार व हातोडी नाला याठिकाणी कोंबिग ऑपरेशन करण्यात येणार आहे .

प्रत्येक टिम बरोबर एक शार्पशूटर्स देण्यात आला आहे. तसेच बिबट्याच्या बंदोबस्तासासाठी 7 पिंजरे, 20 टॅ्रप कॅमेरे लावण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*