भुसावळ रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांना १५ दिवसांची मुदतवाढ

0
भुसावळ |  प्रतिनिधी  :  शहरातील रेल्वे हद्दीतील दोन हजारांपेक्षा अधिक झोपडे तसेच दुकाने हटविण्यात येणार असल्यामुळे येथील रहिवासी, व्यावसायिक बेघर होऊन त्यांचा निवास आणि उपजिवीकेची समस्या उदभवली आहे. त्यामुळे रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यापुर्वी त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी खा.रक्षा खडसे, आ.संजय सावकारे यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने डिआरएम आर.के. यादव यांची भेट घेतली.

झोपडपट्टी धारकांना आपली पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मुदतवाढ देण्यासह झोपडपट्टी एकाच वेळी न काढता विभागनिहाय ठराविक मुदतीत काढण्याची मागणी केली. यावर डिआरएम यादव यांनी निर्णय घेत १५ दिवसांची मुदतवाढ दिली.

याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता हाजी मुन्ना तेली, नगरसेवक प्रा.डॉ.सुनिल नेवे, रमेश मकासरे, नगरसेवक ऍड.बोधराज चौधरी, राजेंद्र आवटे, देवा वाणी, विक्की बत्रा, परिक्षीत बर्‍हाटे, लक्ष्मण जाधव यासह रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनिल मिश्रा, वरिष्ठ अभियंता विनोद भंगाळे, दिनेश गजभिये, पी.बी. तोमर आदी उपस्थित होते. शहरातील रेल्वेच्या जागेवर गेल्या दोन ते तीन पिढ्यापासून हे रहिवासी राहत आहेत.

येथील रहिवासी हातमजूर असल्याने दुसरीकडे जागा विकत घेऊन घरे बांधण्याचे आर्थिक स्थिती नसल्यामुळे शासनाने पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. याठिकाणी किमान दोन हजार झोपडया व काही दुकाने आहेत. त्या हटविण्यास आल्यास हजारो परिवार बेघर होणार आहेत.

त्यामुळे या रहिवाशांना पुनर्वसनासाठी पर्यायी जागा कायमस्वरुपी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी खा.रक्षा खडसे यांनी सांगितले की, अतिक्रमीत परिसरातील तीन ते चार भागात विभागणी करुन दहा- दहा दिवसाआड ते काढण्यात यावे जेणेकरुन रहिवाशांना आपली पर्यायी व्यवस्था करण्यास वेळ मिळू शकेल. यावर डिआरएम यादव यांनी होकार दर्शवित यानुसारच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*