शिरसोली नाक्याजवळ वाळू ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास चिरडले

0

जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-घरून फोन आल्याने हाफ डे सुटी घेवून घरी परतत असलेल्या जैन इरिगेशनच्या कर्मचार्‍याच्या मोपेड दुचाकीला समोरुन भरधाव येणार्‍या वाळुच्या ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. चालक हा ट्रॅक्टर परिसरातील जंगलात सोडून पसार झाला. एमआयडीसी पोलिसांनी ट्रॅक्टर व अपघातग्रस्त मोपडे दुचाकी ताब्यात घेतली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, जैन इरिगेशनमध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले नरेंद्र दिनकर चौधरी वय 55 रा. आराधना कॉलनी हे सकाळी नेहमीप्रमाणे कामावर आले होते. कामावर असतांना त्यांना फोन आल्याने ते हाफ डे सुटी घेवून 11 वाजेच्या सुमारास ते बाहेर पडले.

ते त्यांच्या जवळील मोपेड दुचाकी क्रमांक एमएच 19 डीए 3763 ने घरी जात असतांना शिरसोली जकात नाक्याजवळ समोरुन येणार्‍या वाळुने भरलेला टॅक्टर क्रमांक एमएच 19 एल 8583 त्यांना जोरदार धडक दिली.

या धडकेत ते खाली पडल्याने टॅक्टरचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेले.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालक भिल हा ट्रॅक्टर घेवून पसार झाला.

अपघातस्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जैनइरिगेशन कंपनीचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने चौधरी यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले.

याठिकाणी डॉ. शेख यांनी चौधरी यांना मयत घोषित केले. घटनेची माहिती कळताच नाततेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेवून एकच आक्रोश केला. नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालय गाठल्यानंतर एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

नागरिकांनी केला ट्रॅक्टरचा पाठलाग
चौधरी यांचा चिरडल्यानंतर घाबरलेल्या चालकाने कच्च्या रस्त्याकडे भरधाव ट्रॅक्टर चालवत रस्त्यात ट्रॉलीत भरलेली वाळु फेकून दिली. यानंतर मेहरूण तलाव परिसरातील एका मोकळया जागेत ट्रॅक्टर सोडून पसार झाला आहे.

यावेळी काही जणांनी ट्रॅक्टर चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, चालक हाती लागला नाही. यावेळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ट्रॅक्टरसह दुचाकी पोलिसांच्या ताब्यात
घटनास्थळावर आल्यावर एमआयडीसी पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली. यानंतर पोलिसांनी चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न चालक व ट्रॅक्टर काही मिळून आले नाही.

यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी रामकृष्ण पाटील यांनी मेहरूण तलावाच्या जंगल परिसरात ट्रॅक्टरचा शोध घेतला असता त्या ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीसह मिळून आले.

तर वाटेत रस्त्यात वाळु फेकलेली देखील दिसून आली. यानंतर ट्रॅक्टर ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणण्यात आले. याप्रकरणी डॉ. शेख यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*