मनपा बेकायदेशीर भरती प्रक्रिया : चौकशी अहवालात ठपका : लोक न्यायालयातील तडजोड संशयास्पद

0
जळगाव |  प्रतिनिधी :  तत्कालीन जळगाव नगरपालिकेत सन १९९१-९२ मध्ये कर्मचारी भरती प्रकियेनंतर लगेचच उड्डाण पदोन्नत्या देण्यात आल्याची बाब तत्कालीन मुख्याधिकारी डी.आर.मराठे यांनी संबंधित कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

या नोटीसच्या विरोधात काही कर्मचार्‍यांनी औद्योगिक न्यायालयात दावे दाखल केले होते. या दाव्यांचा लोकन्यायालयात तडजोड झाली आहे. परंतु ज्या कर्मचार्‍यांनी तक्रार केली होती.

 

त्या कर्मचार्‍यांना कोणत्या पदावर कायम करण्यात आलेले आहे. ही बाब स्पष्ट होत नसल्याने लोक न्यायालयात झालेली तडजोड संशयास्पद वाटत असल्याचा ठपका विभागीय चौकशी समितीच्या अहवालात नोंदविण्यात आला आहे.

तत्कालीन नगरपालिकेने राबविलेल्या भरती प्रक्रियेत आणि उड्डाण पदोन्नत्यांबाबत तत्कालीन आयुक्तांनी विभागीय चौकशी समिती नेमली होती. समितीने याबाबत चौकशी करुन त्याचा अहवाल सादर केला होता.

या अहवालानुसार समितीने लेखापरिक्षणाची मागणी देखील केली होती. त्यानुसार भरती प्रक्रिया आणि उड्डाण पदोन्नतीबाबत लेखापरिक्षण करण्यात येणार आहे.

पात्र कर्मचारी वंचित

शासकीय तरतुदी व नगरपालिकेच्या उपविधीमधील तरतुदी विचारात न घेता, उड्डाण पदोन्नत्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे वरिष्ठ कर्मचारी पदोन्नती मिळण्यापासून वंचित राहिले असल्याचे आक्षेप देखील विभागीय चौकशीच्या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

मंजूरी न घेताच भरती प्रक्रिया

तत्कालीन जळगाव नगरपालिकेत वर्ग ३ व वर्ग ४ ची पदे भरतांना कोणतीही जाहीरात देण्यात आलेली नव्हती. तसेच त्यावेळी मागासवर्गीय अनुशेष असल्याबाबत सहाय्यक आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांची कोणतीही मंजूरी आदेश नव्हते. तसेच सेवायोजन कार्यालय व समाज कल्याण विभागाकडून पात्र उमेदवारांच्या याद्या मागविण्यात आल्या नव्हत्या.

नियुक्ती करतेवेळी मुलाखती व परिक्षा घेण्यात आलेल्या नाहीत. तसेच नियुक्ती देतांना कोणतीही विहीत कार्यापद्धतीचा अवलंब केलेला नाही. अंतिम निवड यादी व प्रतिक्षा सुची कुठेही प्रसिद्ध केलेली नाही. असे आक्षेप देखील विभागीय चौकशीच्या अहवालात नोंदविण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*