‘त्या’ कर्मचार्‍यांची वेतन कपात नाही !

0

मुंबई । दि.31 । वृत्तसंस्था-एसटी महामंडळ हे सर्वसामान्य प्रवाशांची सेवा करणार्‍या एसटी कर्मचार्‍यांच्या सोबत आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांनी नुकत्याच केलेल्या संपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी फक्त एक दिवसाचा पगार हा दंड म्हणून कपात करण्यात येईल किंवा जे कर्मचारी संपकाळातील 4 दिवसांसाठी 8 दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील त्यांची कोणतीही पगार कपात करण्यात येणार नाही, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

दिवाकर रावते, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

महामंडळाचा कोणताही कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेला तर संपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी एक दिवस विनाकाम-विनावेतन तसेच 8 दिवसांचा पगार हा दंड म्हणून कपात करण्यात येईल असा निर्णय एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या 29 जानेवारी 2005 रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे.

त्यानुसार नुकत्याच झालेल्या संपकालावधीसाठी कर्मचार्‍यांचे 36 दिवसांचे वेतन कापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना त्रास सोसावा लागू नये यासाठी नुकत्याच झालेल्या संपाच्या बाबतीत या निर्णयास स्थगिती देण्याचा निर्णय रावते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

एसटी कर्मचार्‍यांच्या मान्यताप्राप्त संघटनांनी यासंदर्भात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने या दाव्याचा निर्णय लागेपर्यंत 36 दिवसांचे वेतन कापण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे, असे रावते यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*