निधीअभावी हतनुरच्या पुनर्वसित गावांचा विकास ठप्प

0

जळगाव । दि.7। प्रतिनिधी-गेल्या दिड वर्षापासुन हतनुर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पुनर्वसित गावांचा विकास ठप्प झाला असल्याची माहिती आज झालेल्या आढावा बैठकीच्या निमीत्ताने समोर आली आहे.

दरम्यान या संदर्भात शासनाकडे 14 कोटी रूपयांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली.

हतनुर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या 33 गावांच्या पुनर्वसनासंदर्भात आज जिल्हा नियोजन भवनात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

या बैठकीला खा. रक्षा खडसे, भुसावळचे आ. संजय सावकारे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, भुसावळचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, संबधीत गावांचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

गेल्या दिड वर्षापासुन हतनुर बाधित 33 गावांना विकासकामांसाठी निधी न मिळाल्याने कामे ठप्प झाली आहे. पिण्याचे पाणी, गटारी, विज यासारख्या मुलभूत सुविधांपासुन नागरीक वंचीत आहे.

याबाबत आ. एकनाथराव खडसे यांनी माहिती देतांना सांगितले की, मंत्री असतांना या पुनर्वसित गावांच्या विकासकामांसाठी पाठपुरावा करण्यात आला होता.

मात्र गेल्या दिड वर्षांपासुन निधी न मिळाल्याने याठिकाणची कामे बंद झाली आहेत. जी कामे झाली ती देखिल निकृष्ट झाली असुन ठेकेदार पैशांअभावी पुढील काम करण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आज झालेल्या आढावा बैठकीदरम्यान पुनर्वसन विभागाच्या सचिव मेघा गाडगीळ व महसुल विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चाही करण्यात आली आहे.

या 33 गावांच्या पुनर्वसनासाठी 50 कोटी रूपये लागणार असुन पहील्या टप्प्यात 14 कोटी रूपयांची मागणी करण्यात करण्यात आली असल्याचेही आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

बैठकीत जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यांनी संबंधीत यंत्रणांना पाठपुरावा करून विकासकामांना सुरवात करण्याचे आदेश दिले.

अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेटी देवून ग्रामस्थांच्या भावना व समस्या जाणून घेवून तात्काळ निर्णय घ्यावा कामात कसूर करणार्‍या कंत्राटदारांवर कडक कार्यवाही करावी.

यानंतर होणार्‍या बैठकीत पूनर्वसन कामांच्या प्रगतीचा वेग दिसला पाहिजे अन्यथा कडक कार्यवाहीस सामोरे जावे लागेल अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

11 गावांसाठी नव्याने प्रस्ताव
हतनुरचे बॅकवॉटर घरात घुसू लागल्याने यातील 11 गावांमधील घरांसाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्यासंदर्भातही आढावा बैठकीत चर्चा झाली असुन मांगलवाडी, अंतुर्ली, पिंप्रीनांदु, बेलसवाडी, मुक्ताईनगर, सिंगत, कांडवेल, ऐनपुर या गावांमधील जमिन संपादीत करण्याचाही प्रस्ताव प्रलंबीत असल्याचे आ. खडसे यांनी सांगितले. या बैठकीत भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव, रावेर तालुक्यातील एकूण 33 गावातील भुसावळ तालुक्यातील टहाकळी, मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण, चिंचोल, चांगदेव, कोथळी, मुक्ताईनगर, घोडसगाव, चिंचखेडा, खामखेडा, मेळसांगवे, शेमळदे, पंचाणे, मुंढोळदे, उचंदे, मेंढोदे, पिंप्रीनांदू, धामंदे, अंतुर्ली, जळगाव तालुक्यातील कुंड, रावेर तालुक्यातील मांगलवाडी, तांदलवाडी, सिंगत, पुरी, गोलवाडे, भामलवाडी, शिंगाडी, कांडवेल, ऐनपूर, निंबोल, बोहार्डे, पातोंडी, धुरखेडा, अजनाड गावातील पुर्नवसनाबाबत बाब निहाय आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

*