पारोळ्यात घराचे छत कोसळले; चौघांचा मृत्यू

0

पारोळा । दि.6 । प्रतिनिधी-शहरातील काझी मोहल्ला परिसरात शुक्रवारी पहाटे मातीच्या घराचे छत कोसळल्याने घरातील झोपलेल्या पाच जणांपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला नागरिकांच्या सतर्कतेने वाचवण्यात यश आले.

शहरातील मध्यभागी असलेल्या काझी मोहल्यातील भिकन काझी यांच्या आनंदी परिवारात दि.6 रोजीची पहाट उजळलीच नाही. मात्र एकाच परिवारातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात प्रचंड आक्रोश झाला.

दि. 6 रोजी सकाळी 5 वाजता भिकन काझी यांच्या चार खाल्यांचेे घर त्यात पुढील दोन खोल्यांमध्ये कॉन्क्रीटच्या भिंतीबांधून वर पत्रा टाकलेला होता व मागील दोन खोल्या हे मातीचे बांधकाम होते त्यात भिकन यांच्या पत्नी साहेराबी भिकन काझी (वय 50), मोठा मुलगा हाशिम भिकन काझी (वय 23), लहान मुलगा मोईन भिकन काझी (वय 18), मुलगी शबीना भिकन काझी (वय 17, सर्व मृत) मधला मुलगा वासिम भिकन काझी हे गाढ झोपेत असताना सकाळी 5 वाजता अचानक मातीच्या घराचे छत कोसळल्याने त्यात हे सर्व दाबले गेले त्यात चार जणांचा मातीच्या ढिगार्‍याखाली दबून जागिच मृत्यू झाला, तर एक जणाला वाचवण्यात यश आले.

पलंगावर झोपल्याने वसिम बचावला
वासिम हा परिवारासह एकाच खोलीत झोपला होता. घरातील चार जण खाली झोपले होते तर वसिम हा पलंगावर झोपला होता. त्यामुळे तो बचावला घराचे छत कोसळले. त्यावेळी पलंगावर असल्याने माती निसटली व बचावकार्य करणार्‍या नागरिकांच्या ही बाब लगेच लक्षात आल्याने त्यास काढण्यात लवकर मदत झाली व तो बचावला मात्र त्यास छाती, तोंड,पोटावर जबर मार लागल्याने जखमी झाला असून पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार घेत आहे.

भिकन काझी यांचे वडिल व आत्यादेखील घरातच
भिकन काझी यांच्या आत्या आलिबु दर्शन पठान (वय 85) या वयोवृद्ध असल्याने त्यांच्याकडेच राहत होत्या व भिकन यांचे वडील नथ्थू गुलाब काझी (वय 80) हे दोघे भाऊ-बहिण वयोवृद्ध त्याच घरी होते, परंतु ते पुढील खोल्यांमध्ये पत्र्याच्या छताखाली झोपले होते, त्यामुळे ते बचावले व घराचे कोसळण्याचा आवाज आल्याचे समजताच त्यांनी आरडा ओरड केल्याने ही घटना तत्काळ लक्षात आल्याने बचावकार्य जोमाने सुरू झाले.
कुटुंबप्रमुख भिकन नथ्थू काझी हे चादर विकण्याचा व्यवसाय करत होते त्यानिमित्त ते गुरुवारी गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथे गेले होते. रात्री 8.30 वाजता पत्नीशी फोनवर पारिवारिक चर्चा केली होती व त्यांनतर परिवारातील सर्व जण जेवण करुन रात्री साडेअकराच्या सुमारास झोपले होते. अंकलेश्वर येथून भिकन काझी आल्यावर त्यांनी हंबरडा फोडला.

सुशिक्षीत परिवार घडवला होता
भिकन काझी यांनी आपल्या छोट्याशा चादर विकण्याच्या व्यवसायावर मुलांना शिकवले. मोठा मुलगा हाशिम (शहादा, जि.धुळे) येथे मॅकनिकल इंजिनियरची पदवी घेऊन पास झाला होता. मधला मुलगा वसिम हा मोटरमॅकनिक आय.टी.आय.पास होऊन धुळे येथील एस.टी.महामंडळात अप्रेंटिशिपचा जॉब करत आहे तर लहान मुलगा मोईन शहरातील भविष्य गारमेंट येथे कामाला होता. मुलगी शबीना ही कासोदा येथील उर्दू हायस्कूल येथे 12वीला शिक्षण घेत होती.

घर कोसळल्यानतर मदतकार्य
घर कोसळल्यानंतर परिसरात जोरात आवाज आल्याने ही परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यात नसमुद्दीन काझी, शाहाउद्दीन काझी, नुरुद्दीन काझी, शेखलाल मिस्तरी, सिकंदर काझी, बद्रउद्दीन पिंजारी, फिरोज काझी, मोबिन काझी यांनी धाव घेत मदतकार्य केले.

घटनास्थळी यावेळी पो.नि.एकनाथ पाडळे, प्र. तहसीलदार श्वेता संचेती, उपनिरीक्षक अजितसिंग देवरे, हे.कॉ.बापू पाटील, मंडळ अधिकारी एस.पी.शिरसाठ, शहर तलाठी पी.एस.बाविस्कर यांनी घटनास्थळी व रुग्णालयात जाऊन पंचनामा केला.

माजी नगरसेवक अजित मंसुरी, डॉ.अमीन कुरेशी, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, जि.प.सदस्य रोहन पाटील, हिम्मत पाटील, काँग्रेसचे पिरन अनुष्ठान, नगरसेवक मनोज जगदाळे, नितीन सोनार यासह सामाजिक कार्यकर्ते, समाजबांधव यांनी भेट देवून सांत्वन केले.

प्रशासकीयदृष्ट्या पंचनामे झाले. जखमीवर प्रथमोपचार तसेच मृतांचे शवविच्छेदन डॉ.योगेश साळुंखे, डॉ.धनंजय पाटील, डॉ.सुनील पारोचे, प्रमोद सूर्यवंशी, दीपक सोनार, प्रसाद राजहंस, परिचारिका चारुशीला संघपाल, राजू वानखेडे यांनी केले.
दोन वर्षांपूर्वी 4 ऑगस्ट 2015 मध्ये पारोळा शहरातील श्रीराम चौकातील भगवान मेखे यांचे मातीचे घराचे छत कोसळून त्यात भगवान मेखे यांचेसह पत्नी, दोन मुले असे दबून मृत झाले होते.

त्यानंतर ही आजची घटना मन हेलावणारी होती. अशा घटना यापुढे घडू नयेत, म्हणून न.पा.प्रशासनाने शहरात जीर्ण इमारती, घरे तपासणी करुन त्यांना नोटीसा देवून पडक्या व धोकेदायक इमारती, घरे पाडण्यास भाग पाडावे किंवा त्याठिकाणी रहिवास टाळावा आणि त्यांना शासनाच्या घरकुल योजनेत समाविष्ट करुन घ्यावे, अशी अपेक्षा घटनेनंतर व्यक्त होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

*