शहरात दोन महिन्यांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा : प्रशासनाच्या दुर्लक्षाने नगरसेवक संतप्त

0
जळगाव |  प्रतिनिधी : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असून देखील उपाययोजना केली जात नसल्याची खंत बंटी जोशी यांनी व्यक्त केली.

तर पृथ्वीराज सोनवणे यांनी जलशुद्धीकरण केंद्रात केमिकलचे प्रमाण योग्य नसल्याचा आरोप केला. दरम्यान, संबंधितांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करत, नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.

मनपा स्थायी समितीची सभा सभापती डॉ.वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते.

विषयपत्रिकेवरील प्रभाग क्रमांक ४ मध्ये सफाईची कामे मक्तेदारामार्फत न करता मनपाच्या कर्मचार्‍यांकडून करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर अन्य विषय देखील मंजूर करण्यात आलेत.

रस्त्यांची कामे अपूर्ण
पावसाळा तोंडावर आला तरी महापालिकेने चार प्रभागातील रस्तांची दुरुस्तीची १ कोटी २० लाखाची व मुख्य रस्त्यांची ८० लाख रूपयांची कामे अद्याप पूर्ण केली नसल्याबद्दल नितिन बरडे यांनी संताप व्यक्त केला. यावर आयुक्त जीवन सोनवणे यांनी पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याची सुचना दिली.

सेवाकराच्या नावाखाली मक्तेदाराची अडवणूक

मक्तेदारांच्या बिलातून सेवाकराच्या नावाखाली अडवणूक केली जात आहे. त्यामुळे मक्तेदार काम करण्यास नकार देत असल्याने कामांना ब्रेक लागला आहे.
त्यामुळे आता मनपासमोर नागरिकांची कामे होणार नाही,आम्ही फक्त पगारासाठी काम करतो असा फलक लावा असा नितीन बरडे यांनी टोला लगावला.
पाणीपुरवठा विषयांवरुन नगरसेवक आक्रमक

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पिवळसर रंगाचा आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. मात्र प्रशासनाकडून यावर उपाययोजना केली. जात नसल्याबद्दल बंटी जोशी यांनी संताप व्यक्त केला.

प्रशासनाने कारवाई न केल्यास मला यात खोलात शिरावे लागेल असा इशारा जोशी यांनी दिला. यावर आयुक्तांनी तुम्ही खोलात शिरावे, ही माझी विनंती आहे सत्य बाहेर आल्यास दोषींवर कारवाई करु असे सांगितले.

त्यानंतर पुथ्वीराज सोनवणे यांनी शुध्दीकरणात वापरल्या जाणार्‍या केमिकलचे प्रमाण योग्य नसल्याने अशुध्द पाणी होत असल्याचा आरोप केला.

निमखेडी भागात स्पीड ब्रेकरची मागणी

निमखेडी परिसरात वाळूची अवैध वाहतुकीचे डंपर सुसाट जातात. काही दिवसापूर्वी वाहनाने बालकाचा बळी घेतला. त्यामुळे स्पीड ब्रेकर करण्याची मागणी ज्योती इंगळे यांनी केली.

दरम्यान, मनपा, वाहुतक शाखा व आरटीओ यांच्या संयुक्त समितीकडे प्रस्ताव द्यावा लागणार असल्याचे आयुक्तांनी सांगीतले. शहरात आधीच ८०० स्पीड ब्रेकर आहेत. ते शास्त्रशुध्द पध्दतीने आहेत की नाही याची जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पाहणी करणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.

अमृतमधून उद्यानांची कामे कशी करणार?

अमृत योजनेंतर्गत मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना न्यायप्रविष्ठ आहे. तर मग अमृतमधूनच उद्यानाची कामे कशी करणार? असा सवाल पुथ्वीराज सोनवणे यांनी उपस्थित केला.

यावर आयुक्त जीवन सोनवणे यांनी उद्यानाचे काम करता येईल परंतु पाणीपुरवठ योजनेसह मलनिस्सारण योजनेचे काम करता येणार नसल्याचे सांगितले.

गाळ्यांसंदर्भात ठरावाची अंमलबजावणी करावी

मुदत संपलेल्या गाळ्यांच्या ठरावासंदर्भात अद्याप प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. असे म्हणत या ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करावी, असा ठराव नितीन बरडे यांनी मांडला.

आरोग्य अधिकार्‍यांना धरले धारेवर

नाले सफाईची कामे व कॅरीबॅग निर्मुलनाबाबत कारवाई होत नसल्याने आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांना सभापती वर्षा खडके यांनी चांगलेच धारेवर धरले.

यावेळी बंटी जोशी यांनी आरोग्य अधिकार्‍यांकडे वाहन नसल्याचे ते सांगतात अशी असे म्हणताच सभापत खडके यांनी माझे वाहन घ्या पण कामे करा असे सुनावले. त्यानंतर आयुक्तांनीही आरोग्य अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.

LEAVE A REPLY

*