पंचकुला (हरियाणा) । दि.25 । वृत्तसंस्था-‘डेरा सच्चा सौदा’प्रमुख बाबा राम रहीम गुरमीत सिंग यास कोर्टाने दोषी जाहीर केल्यानंतर पंचकुला येथे जमा झालेले राम रहीम समर्थक हिंसक झाले आहेत.
राम रहीमला अटक झाल्यानंतर उसळलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच या हिंसाचारात तब्बल 250 लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

राम रहीम यांना दोषी असल्याचे जाहीर केल्यानंतर ताबडतोब अटक करून लष्कराच्या ताब्यात देण्यात आले. राम रहीमला रोहतकला हलवण्यात आले आहे.

त्यानंतर मोठ्या संख्येने जमा झालेल्या राम रहीम समर्थकांनी हिंसात्मक होत मीडियाच्या ओबी व्हॅन्सवर हल्ला चढवला. जमावाने अधिक हिंसक होत मीडियाची एक ओबी व्हॅन पेटवून दिली, तर उभ्या असलेल्या इतर ओबी व्हॅन्स उलथून टाकण्यात आल्या.

टाईम्स नाऊ आणि आज तक या वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅन्सचीही तोडफोड करण्यात आली. सिरसा येथे उसळलेल्या हिंसाचारात चित्रिकरण करत असलेला एक कॅमेरामनदेखील जखमी झाला आहे.

सशस्त्र पोलिसही हतबल
इतक्यावरच न थांबता संतप्त जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक करणेही सुरू केले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पाण्याचे फवारेही मारले. पोलिसांनी आवश्यक तेथे जमावावर लाठीचार्जही केला. इतक्यावरच न थांबता पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. मात्र जमाव काही केल्या शांत होत नसल्याचे चित्र होते. जमाव आक्रमक झाल्याने सशस्त्र पोलिसांनाही अनेकदा माघार घ्यावी लागत आहे.

संपत्ती जप्तीचे आदेश
बाबा राम रहीमला बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसेमुळे सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. याची दखल पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने घेतली असून झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी डेराची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पंचकुलामधील वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांना अर्धसैनिक दलाची सुरक्षा पुरवण्यात यावी, असे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

‘डेरा’विरोधात शस्त्र चालवा! – कोर्ट
निकालानंतर कायदा-सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी घेण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. तसेच सुरक्षा यंत्रणांना काहीशी मोकळीक दिली आहे. कुठल्याही प्रकारे अराजक माजवण्याचा प्रयत्न खपवून घेऊ नका. आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर बारकाईने लक्ष ठेवा. चिथावणीखोर वक्तव्य करणार्‍यांवर गुन्हा दाखल करा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*