यावल पंचायत समिती सभापती अपात्र

0
यावल । दि.11 । प्रतिनिधी-काँग्रेसच्या पाठबळावर सभापतीपदावर ईश्वर चिठ्ठीने विजयी झालेल्या सौ. संध्या किशोर महाजन यांना पक्षातंर्गत बंदी कायद्यान्वये अपात्र करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे गटनेता दिपक पाटील यांनी व्हीप झुगारल्या प्रकरणी महाजन विरोधात अपात्रतेचा प्रस्ताव दाखल केला होता. या निर्णयामुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
यावल येथील पंचायत समितीच्या सभापतीपदावर काँग्रेसच्या पाठबळावर विजयी झालेल्या सौ. संध्या किशोर महाजन यांना पक्षांतर्गत बंदी कायद्यान्वये महाराष्ट्र स्थानिक संस्था सदस्य अनर्हता अधिनियम (1983 कलम 3/1/ख) अन्वये पंचायत सदस्यपदी अपात्र ठरवायचा आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दिला आहे. मार्च 2017 मध्ये यावल पंचायत समिती सभापती निवड झाली होती.

तेव्हा भाजपने अपक्ष उमेदवार सौ.पल्लवी चौधरी यांना सभापतीपदाची उमेदवारी देवून पक्षाच्या पाच सदस्यांनी त्यांना मतदान करावे, असा व्हीप बजावला होता. सौ.संध्या किशोर महाजन या भाजपकडून निवडलेल्या सदस्य होत्या.

त्यामुळे त्यांनाही भाजपने व्हीप बजावून सौ.पल्लवी चौधरींना मतदानाचा आदेश दिला होता. मात्र सभापती निवडणूकपूर्वी सौ.संध्या महाजन यांनी ऐनवेळी काँग्रेसचा पाठींबा घेत स्वतःच सभापतीपदाची उमेदवारी केली आणि त्यांनी सौ.पल्लवी चौधरींचा पराभव करीत सभापतीपद जिंकले होते.

यावलमध्ये भाजप जिंकली व भाजप हरली असे झाले होते. सौ.संध्या महाजन यांनी भाजप गटनेता यांचा आदेश डावलल्याने दीपक पाटील यांनी त्यांच्या विरोधात जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार कारवाईची याचिका दाखल केली होती.

त्यावर सुनावणी होवून निंबाळकर यांनी सौ. संध्या महाजन यांचे पंचायत समिती सदस्यत्व रद्द ठरविल्याचा आदेश दिला आहे.

दाद मागणार!
भाजपची सभापती म्हणुन निवडून आले होते व गटनेता यांनी बजावलेला व्हीप आपल्यापर्यंत पोहचला नव्हता तर पक्षाच्या व्यक्ती ऐवजी अपक्ष उमेदवाराला भाजपने सभापतीपद देणे हा आपल्यावर अन्याय होता. या निर्णयाच्या विरोधात आपण अपीलात जाणार आहोत, असे यावल पंचायत समिती सभापती सौ. संध्या किशोर महाजन यांनी ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

 

LEAVE A REPLY

*